झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या राज्याच्या इतिहासात एकदा मुख्यमंत्री झालेली व्यक्ती सत्तेत असतानाच पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आलेली नाही. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री असलेले रघुवर दास याला अपवाद ठरतील का? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

यापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री असलेले बाबूलाल मरांडी, शिबू सोरेन, हेमंत सोरेन, अर्जुन मुंडा आणि मधु कोडा हे एकदा मुख्यमंत्री बनल्यानंतर पुन्हा पुढच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. अद्याप राज्यात असा कोणताही मुख्यमंत्री झाला जो सत्ता असताना पुन्हा एकाद निवडून आला आहे. सध्याचे मुख्यमंत्री असलेले रघुवर दास हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा ७० हजार मताधिक्याने विधानसभेवर निवडणून आले होते.

मात्र, यावेळी रघुवर दास यांच्यासाठी विजय अवघड मानला जात आहे. दास यांच्याच मंत्रीमंडळातील सदस्य आणि बंडखोर नेते सरयू राय यांचे त्यांना आव्हान आहे. तसेच त्यांचा मार्ग आणखी कठीण करण्यासाठी काँग्रेने आपले प्रवक्ते गोपाल वल्लभ यांना तिकीट दिले आहे.

अटलबिहारी वाजयेपींचे सरकार असताना उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या तीन राज्यांची निर्मिती करण्यात आली होती. १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड राज्याची निर्मिती झाली होती. त्यावेळी बिहारच्या विधासभा निवडणुकीत जिंकलेल्या सदस्यांच्या मदतीनेच झारखंडच्या पहिल्या विधानसभेची निर्मिती झाली होती. आज झारखंड राज्याची निर्मिती होऊन १९ वर्षे झाली आहेत. राज्यात आजवर ३ वेळा विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या काळात ६ राजकीय नेते मुख्यमंत्री बनले आहेत. यामध्ये बाबूलाल मरांडी, अर्जुन मुंडा, शिबू सोरेन, मधू कोडा, हेमंत सोरेन आणि रघुवर दास यांचा समावेश आहे. यावेळी चौथ्यांदा राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या आहेत.