व्हायब्रंट गुजरात अभियानाचा गुजरातमधील कोणत्याच समाजाचा फायदा झाला नाही. केवळ १५ व्यक्तींनाच या सगळ्यातून फायदा झाला आणि आता त्याच व्यक्ती त्याच्या जाहिरातबाजीसाठी पैसे देत आहेत. इतर लोक केवळ बघत आहेत, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते सोमवारी गुजरातमधील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी गुजरात सरकार आणि उद्योगपतींचे साटेलोटे असल्याचा आरोप केला. गुजरातमध्ये हजारो एकर जमिनी मोठ्या उद्योगपतींना भेट म्हणून देण्यात आल्या. जेव्हा शेतकऱ्यांनी या सगळ्याला विरोध केला तेव्हा पोलिसांनी त्यांच्या घरातील स्त्रियांना मारले. सध्या गुजरातमध्ये केवळ १० ते १५ लोकांची सत्ता चालते आणि त्यांची नावे तुम्हाला माहिती आहेत, असे राहुल यांनी म्हटले. यावेळी राहुल यांनी पाटीदार समाजाच्या आरक्षणासंदर्भातही भाष्य केले. ज्या पाटीदार समाजातील लोकांनी मोदी यांना मते दिली होती, तेच लोक आता माझ्याकडे येत आहेत. आमच्या मुलांना शिक्षण मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. मग या सगळ्यातून कोणाचा फायदा होत आहे, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. ‘व्हायब्रंट गुजरात’च्या माध्यमातून निर्माण करण्यात चित्र फसवे असून त्यामुळे कोणाचाही फायदा झालेला नाही. केवळ मोजक्या व्यक्तींना या सगळ्याचा फायदा झाला असून तेच लोक या सगळ्याच्या जाहिरातबाजीसाठी पैसा पुरवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये पाटीदार समाजातील लोकांची मते महत्त्वाची आहेत. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी ५२ जागा सौराष्ट्रातील आहेत. त्यापैकी ३०हून अधिक जागांवर पाटीदार समाजातील मतदारांचे वर्चस्व आहे. गुजरातमधील निवडणूक निकाल बदलण्याची ताकद या मतदारांमध्ये आहे. त्यामुळेच सर्वच पक्षांचे लक्ष येथील मतदारांवर असते.