अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य पूर्णपणे काढून घेतलं जाणार नाही, कारण तालिबान पुन्हा त्या देशाचा ताबा घेणार नाही याची काळजी घेणे भाग आहे, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केले आहे. २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी अमेरिकेचे अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेण्याचे आश्वासन दिले होते.

ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिस येथे वार्ताहरांना सांगितले की, आमच्या गुप्तचर यंत्रणा सक्षम आहेत. सैन्यमाघारीनंतरही आमचे कुणीतरी नेहमीच अफगाणिस्तानात राहील. तालिबान व अफगाणिस्तान यांच्यातील शांतता वाटाघाटींबाबत प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, “आम्ही आता योग्य मार्गावर आहोत. काही पर्याय समोर आहेत. त्यातील नवा प्रस्ताव त्यांना मंजूर आहे की नाही, ते माहिती नाही. कदाचित त्यांना तो पटणार नाही पण आम्ही चर्चा करीत राहू. इतर अध्यक्षांनी केले नाही त्यापेक्षा अधिक मी केले. आम्ही सैन्य कमी केले पण काही प्रमाणात आमचे अस्तित्व कायम राहील. आम्ही पूर्णपणे माघार घेणार नाही”. तालिबानचे पूर्ण नियंत्रण असलेला अफगाणिस्तान तुम्हाला मान्य आहे काय, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘काय होते ते बघू या. वाटाघाटीतून काय बाहेर येते ते बघू, नंतर ठरवू.’

याशिवाय, भारताने अफगाणिस्तानात आयसिसशी दोन हात करावेत असेही ट्रम्प यांनी सुचवले आहे. भारत, रशिया, टर्की, इराण, इराक आणि पाकिस्तान या देशांनी अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेटविरोधात लढाई आणखी तीव्र केली पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

२००१ पासून आतापर्यंत युद्धग्रस्त अफगाणिस्तानात अमेरिकेचे २४०० सैनिक मारले गेले आहेत.