केंद्र सरकारने टीव्हीवरील कंडोमच्या जाहिरातींसाठी वेळ निश्चित केली आहे. त्यामुळे यापुढे वाहिन्यांना सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान कंडोमच्या जाहिराती दाखवता येणार नाहीत. कंडोमच्या जाहिरातींमुळे मुलांच्या मनावर विपरित परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. याबद्दलची सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व वाहिन्यांना दिली आहे.

कंडोमच्या जाहिरातींसाठी सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. यानुसार, कंडोमच्या जाहिराती रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच टीव्हीवर दाखवता येणार आहेत. लहान मुलांच्या मानसिकतेवर होणारे प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने या मार्गदर्शक तत्त्वांची सूची सर्व टीव्ही वाहिन्यांना पाठवली आहे. कंडोमच्या जाहिराती एका विशिष्ट वयोगटातील लोकांसाठी असून त्या लहान मुलांसाठी नाहीत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मुलांच्या सुरक्षेला धोका पोहोचू नये आणि शरीरासाठी हानीकारक असलेल्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधले जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. अश्लिलतेकडे झुकणाऱ्या आणि मनात घृणा निर्माण करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घातली जाऊ शकते, असे नियम सांगतात, याकडेही सरकारने लक्ष वेधले आहे. एड्सला रोखण्यासाठी गर्भ निरोधक आणि कंडोमचा वापर करावा, अशी जनजागृती सरकारकडून केली जाते. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मोफत कंडोमचे वाटपदेखील केले जाते. मात्र लहान मुलांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम लक्षात घेत सरकारने या जाहिराती दाखवण्यावर निर्बंध आणले आहेत.