अविश्वास ठरावावर बोलताना समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांनी केंद्र सरकारवर टीका केली. विरोधकांचे सोडा, भाजप नेतेच मोदी सरकारवर संतुष्ट नाहीत. सध्या भाजप नेते रडत आहेत. सरकारने शेतकरी, युवक व व्यापारी यांच्यासाठी काही केले नाही असे भाजप नेत्यांचेच म्हणणे आहे, आता कुठल्या तोंडाने जनतेसमोर जाणार असा त्यांचा सवाल आहे, असे मुलायमसिंह म्हणाले. सरकारने एकही आश्वासन पाळले नाही, असा आरोप करताना ते म्हणाले की, सरकाराने २ कोटी युवकांना रोजगाराचे आश्वासन दिले होते. प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करणार असल्याच्या गोष्टी केल्या, पण यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

उत्तर प्रदेश हा देशाचा एक षष्ठांश हिस्सा आहे असे सांगून त्यांनी सांगितले की, एकटय़ा उत्तर प्रदेशातील कारभार सुधारला तरी सगळ्या देशाचे काम होऊन जाईल. व्यापारी वस्तू व सेवा कर व नोटाबंदीने त्रस्त आहेत. शेतक ऱ्यांच्या समस्यांबाबत टिप्पणी करताना त्यांनी जुन्या गोष्टींना उजाळा देताना सांगितले की, एकेकाळी अमेरिकेत शेतक ऱ्यांनी गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेतले होते पण तेथील सरकारने तो गहू समुद्रात फेकला पण शेतक ऱ्यांचा तोटा होऊ दिला नाही. आपल्या देशातील शेतकरी मेहनती आहेत पण पैशाअभावी ते जीव देत आहेत. खते, बियाणे, सिंचन सगळे महाग झाले आहे. मोदी सरकारने शेतकरी, युवक व व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात. मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, तुमच्या सरकारमधील लोकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री काय करीत आहेत याची माहिती नाही.  कैराना, फुलपूर (उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ), गोरखपूर ( मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ) या सगळ्या ठिकाणी समाजवादी पक्षाचा विजय झाला यातून योग्य तो संदेश गेला आहे.