No Confidence Motion in Lok Sabha: टीडीपीने मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला असून अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारने विश्वासमत ठराव जिंकला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुरु झालेलं कामकाज तब्बल १२ तास सुरु होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. मात्र मोदी सरकारने मोठ्या फरकारने विश्वासमत जिंकत विरोधकांना धक्का दिला. मोदी सरकारला एकूण ३२५ मतं मिळाली, तर १२६ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मत नोंदवलं.

मतदानासाठी लोकसभा सभागृहात एकूण ४५१ सदस्य हजर होते. यामधील ३२५ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात तर १२६ जणांनी बाजूने मतदान केलं. बहुमत मिळाल्याने टीडीपीने मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. १९९ मतांच्या फरकाने अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला. यावेळी ८४ खासदार सभागृहात गैरहजर होते, ज्यामध्ये शिवसेनेच्या खासदारांचाही समावेश होता.

भाजपाचे दोन खासदार के सी पटेल आणि भोला सिंह आजारी होते, मात्र मतदानासाठी ते सभागृहात पोहोचले. तर खासदार पप्पू यादव मतदान प्रक्रियेत भाग न घेताच सभागृहातून निघून गेले.

तसं पहायला गेलं तर अविश्वास प्रस्तावावर प्रत्येक पक्षाने काही खास हेतूने सभागृहात हजेरी लावली तसंच काहींनी गैरहजर राहणं पसंद केलं. ही चर्चा म्हणजे निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचं म्हटलं जात होतं. काँग्रेसला आपण विरोधकांचं नेतृत्व करत असल्याचं सिद्ध करुन दाखवायचं होतं हे यामधून समोर आलं. इतर विरोधी पक्षांनी आपण एकत्र आहोत असं दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तरी दुसरीकडे आपण स्वबळावर असल्याचं सांगत भूमिका मांडल्या.

टीएमसीचा भाजपावर हल्लाबोल
निवडणुकीआधी विरोधकांना एकजूट करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तृणमूल काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका करताना पुन्हा एकदा येणारी निवडणूक प्रादेशिक पक्षांची असेल असा इशारा दिला.

शिवसेनेचा आधी विरोध नंतर तटस्थ
अविश्वास ठरावावरुन शिवसेना प्रचंड गोंधळात असल्याचं पहायला मिळालं. मात्र चर्चेला सुरुवात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांनी आपण तटस्थ राहणार असल्याचं जाहीर केलं. शिवसेनेने तटस्थ राहून राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. एकीकडे मुखपत्र सामनामधीन टीका केल्यानंतर मतदानातून माघार घेण्यात आली. मात्र राहुल गांधींच्या भाषणानंतर त्यांचं कौतुक करत आपण अद्यापही सरकारच्या बाजूने नसल्याचे संकेत त्यांनी दिले.

AIADMK: आधी हल्ला, नंतर तटस्थ
एआयडीएमके द्विधा मनस्थितीत असल्याचं वाटत होतं. एकीकडे मोदी सरकारला त्यांचं समर्थन होतं, मात्र त्यांना आपण पुर्णपणे त्यांना पाठिंबा देत आहोत हेदेखील दाखवायचं नव्हतं. अशा परिस्थितीत चर्चेदरम्यान त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला केला, पण विरोधकांना साथही दिली नाही आणि तटस्थ भूमिका घेत निघून गेली.

बीजेडी : दोन्ही पक्षांपासून दोन हात लांब
ओडिशाचे नवीन पटनायक यांचा पक्ष बीजेडीने पुन्हा एकदा भाजपा आणि काँग्रेसपासून दोन हात लांब राहणं पसंद करत चर्चेपासून स्वत:ला दूर ठेवलं. चर्चेला सुरुवात होताच बीजेडीच्या खासदारांनी सभात्याग केला. बीजेडीचे लोकसभेत २० खासदार आहेत. पुढील वर्षी ओडिशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूक होणार आहे, ज्यामध्ये बीजेडी दोन्ही पक्षांविरोधात लढणार आहे.