No Confidence Motion in Lok sabha: जनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात लोकसभेत मांडलेला प्रस्ताव आज ३२५ विरुद्ध १२६ असा फेटाळण्यात आला. सकाळी ११ वाजता ही चर्चा सुरू झाली. त्यानंतर अनेक खासदारांनी मते मांडल्यानंतर आणि पंतप्रधान मोदी यांचे भाषण झाल्यानंतर मतदान पार पडले. या मतदानात अविश्वास ठरावाच्या बाजूने १२६ मते पडली तर ठरावाच्या विरोधात ३२५ मते पडली. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

सत्तेच्या चार वर्षांत पहिल्यांदाच मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात आला असून आज यावर चर्चा झाली. विरोधी गटातील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगु देसम, सप या प्रमुख पक्षांची एकी कायम राहिल्याचे दिसले. ‘आप’नेही मोदी सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला.  पण सत्ताधारी भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने केंद्र सरकारला धोका निर्माण झाला नाही. पण कुंपणावर असलेले प्रादेशिक पक्ष नेमके कोणत्या बाजूला झुकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी कुंपणावरील पक्ष नेमके कोणाच्या बाजूने जातात, यालाही महत्त्व आले आहे.

लोकसभेत एकूण ५४४ जागा असून विद्यमान सदस्यसंख्या ५३४ इतकी आहे. बहुमतासाठी २६८ ची आवश्यकता आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे ३१४ खासदारांचे बळ आहे. यात भाजपाचे २७३ आणि मित्रपक्षाचे ४१ खासदार आहेत. विरोधकांकडे काँग्रेस (४८), तृणमूल काँग्रेस (३४), तेलगू देसम (१६) आणि अन्य पक्ष (४९) असे मिळून १४७ खासदारांचे बळ आहे. दरम्यान, शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली होती. त्यामुळे एकूण ४५१ खासदारांनी मतदान केले.