आम्ही स्वार्थी हेतूने सरकार चालवत नाही. विरोधकांच्या भाषणात फक्त ‘मोदी हटाव’ एवढेच ऐकू येते. पण हा विरोध विकासाला आहे, हे आज भारताच्या जनतेने पाहिले. त्यामुळे हा अविश्वास ठराव ही सरकारची परीक्षा नाही, तर विरोधकांचीच परीक्षा आहे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या भाषणात विरोधकांना लगावला. ही भाजपची नाही तर काँग्रेसची परीक्षा आहे. या बहाण्याने आपल्यासोबत कोण आहे, कोण नाही हे तपासून पाहिले जात आहे. सहकाऱ्यांची परीक्षा घ्यायची असेल तर खुशाल घ्या, पण अविश्वास प्रस्तावाचे नाटक करू नका, असे मोदी म्हणाले.

आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’ या सूत्रानुसार देश चालवत आहोत आणि त्यावर आम्ही कायम राहू. विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक आहे. भाजप युतीकडे गरजेसाठी लागणारे बहुमत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा, असेही आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. जर विरोधक चर्चेसाठी तयार नव्हते, तर हा प्रस्ताव आणण्यामागचा हेतू काय? या प्रस्तावावर मतदानाला उशीर करण्यामागचे विरोधकांचे काय प्रयोजन आहे, असा सवाल मोदी यांनी केला.

ज्यांना पंतप्रधानांच्या जागेवर बसण्याची घाई आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की इथून कोणालाही उठवता येत नाही किंवा बसवता येत नाही. येथे फक्त जनता बसवते. १२५ कोटी जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. पण केवळ एका मोदीला हटवण्यासाठी जे एकमेकांची तोंड पाहत नाहीत, ते देखील एकत्र आले आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.