केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला गेला. त्यानंतर लोकसभेत खासदारांची चर्चा सुरू झाली. अशात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बोलू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाबाहेर जाण्याबाबत त्यांना टीका करायची होती. त्यावेळी राहुल गांधी यांची गडबड झाली. मोदीजी बाहर जाते हैं ऐवजी राहुल गांधी यांनी मोदीजी बार जाते है असे म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हसू आवरले नाही. राहुल गांधी यांनी तातडीने आपले बोलणे सावरले, त्यानंतर त्यांनी मोदीजी बाहर जाते हैं मगर उससे देशको फायदा नहीं होता असे म्हणत त्यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका केली.

आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांचाही समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत. युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन आणि इतर अनेक आश्वासनांचा मोदींना सोयीस्कर विसर पडला आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.

चीन सरकार २४ तासात ५० हजार युवकांना रोजगार देऊ शकते, तर केंद्र सरकारने किमान २४ तासात किमान ४०० लोकांना तरी नोकरी द्यावी असेही आव्हान राहुल गांधी यांनी दिले. काही आरोप जेव्हा राहुल गांधी करत होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हसू आवरत नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणायचे की देशाचा पंतप्रधान नाहीतर चौकीदार आहे. मात्र व्यापाऱ्यांबद्दल त्यांनी जी आस्था दाखवली आहे त्यावरून पंतप्रधान देशाचे चौकीदार नाही तर भागीदार आहेत असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मी जे मुद्दे भाषणात मांडतो आहे, त्यानंतर ते माझ्या डोळ्याला डोळे भिडवू शकत नाहीत असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या या आरोपालाही पंतप्रधान हसतच होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेत विरोधकांनी एकच गोंधळ घातला.