मतांची अभिव्यक्ती कितीही स्पष्ट, मान्य न होण्यासारखी आणि काहीजणांसाठी अप्रिय अशी असली, तरी त्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिशीला सोमवारी दिलेल्या उत्तरात अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे.

प्रशांत भूषण यांच्या ट्विटरवरील विधानांमुळे सकृतर्शनी न्यायदानाची अपकीर्ती झाली आहे असे मत व्यक्त करून, त्यांच्या २ कथित बदनामीकारक वक्तव्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने २२ जुलैला त्यांना नोटीस जारी केली होती. या प्रकरणाची सुनावणी ५ ऑगस्टला होणार आहे.

आपल्या वकील कामिनी जैस्वाल यांच्यामार्फत दाखल केलेल्या १४२ पानांच्या शपथपत्रात भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निवाडे, न्यायालयीन अवमानाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान व माजी न्यायमूर्तीची भाषणे, तसेच लोकशाहीत ‘मतभेदांचा कोंडमारा’ आणि काही प्रकरणांमध्ये न्यायिक कार्यवाहीबाबत आपली मते यांचा हवाला दिला आहे. आपल्या दोन ट्वीट्सवर आपण कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

घटनेच्या अनुच्छेद १९(१)(अ)मध्ये नमूद केलेल्या भाषण व अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संदर्भ देऊन, घटनेने जी मूल्ये पवित्र मानली आहेत, त्यांचा हा अनुच्छेद म्हणजे संरक्षक असल्याचे भूषण यांनी नमूद केले आहे.