इस्लामाबादमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या सार्क देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीला अर्थमंत्री अरूण जेटली सहभागी होण्याचे अजून निश्चित झाले नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने गुरूवारी सांगितले.
इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क देशाच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीला भारताच्या सहभागाबाबत आणखी निर्णय झाला नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इस्लामाबाद येथे २५ व २६ ऑगस्ट रोजी ही बैठक होणार आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे जेटली हे सार्क परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले होते.
जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. शेजारील देशाने त्याबाबत दुहेरी भूमिका घेतली असून चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात असल्याचेही स्वरूप म्हणाले. त्यांनी या वेळी आण्विक पुरवठादार संघ (एनएसजी) सदस्यत्वाबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व चीनचे मीन वँग यांच्याशी झालेल्या बैठकीची माहिती दिली. भारताचे सभासदस्तव एनएसजी गटासाठी महत्वपूर्ण असल्याचे चीनने म्हटल्याचे असून भारत  ‘नाम’ देशांना महत्व देत असल्याचेही ते म्हणाले.
पाकिस्तानबरोबरील परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेत काश्मीर मुद्द्यावर बोलण्यापेक्षा सीमेवर होणाऱ्या दहशतवादावर चर्चा करण्यास भारत तयार असल्याचे बुधवारी भारताने स्पष्ट केले होते. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. या पार्श्वभुमीवर दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री अरूण जेटली इस्लामाबाद येथे होणाऱ्या सार्क देशाच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले होते.