केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री जावडेकर यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्राने ३ मे नंतर रेल्वे व विमान सेवा सुरू करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नसून त्याबाबत इतरांनी पूर्वानुमान करू नये, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी तीन मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारने रेल्वे व विमान सेवा सुरू करण्याबाबत काही कालमर्यादा ठरवली आहे का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की,‘ टाळेबंदी एक दिवस उठणार आहे पण कुठल्या दिवशी हे अजून ठरलेले नाही. त्याबाबत लोकांनी चर्चा करणे योग्य नाही. आम्ही रोज परिस्थितीचा अभ्यास करीत आहोत. त्यातून नवीन काहीतरी गोष्टी पुढे येत आहेत. काही विमान कंपन्यांनी स्वत:हून ४ मे पासूनचे बुकिंग सुरू केले आहे. हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी विमानसेवा ४ मे पासून सुरू करणार असल्याचे जाहीर केलेले नाही.याबाबतचा निर्णय सरकार घेणार आहे, त्यासाठी कुणीही ठोकताळे बांधू नये.’

विमान कंपन्यांना इशारा

एअर इंडियासह काही विमान कंपन्यांनी निवडक मार्गावरचे ४ मे पासूनचे बुकिंग सुरू केले आहे. त्यामुळे हरदीप सिंग पुरी यांनी या कंपन्यांना सरकारच्या निर्णयाशिवाय असे करणे चुकीचे असल्याचा इशारा दिला आहे. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नसतानाच विमान कंपन्यांनी ४ मे पासून विमानसेवा सुरू होणार असल्याचे गृहीत धरून बुकिंग सुरू केले आहे.

प्रवाशांना परताव्याचा प्रश्न

रेल्वेने मात्र पंतप्रधान मोदी यांनी ३ मे पर्यंत टाळेबंदी वाढवल्यानंतर आधीचे बुकिंग रद्द केले असून नवीन बुकिंग सुरू केलेले नाही. विमान कंपन्यांनी प्रवाशांनी आधी केलेले बुकिंग रद्द करण्यास परवानगी दिली पण पैसे परत देण्यास नकार दिला होता. पैसे परत मागण्याऐवजी प्रवाशांनी त्याच तिकिटाच्या माध्यमातून नंतर प्रवासाचे नियोजन करावे असे पूर्वी म्हटले होते.