राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी खुद्द नितीश कुमार यांनी आपण पंतप्रधान बनण्याचे स्वप्नही कधी बघितले नसल्याचे सोमवारी सांगितले. पंतप्रधानच काय मी कधी मुख्यमंत्री होईल, असेही मला कधी वाटले नव्हते, असे त्यांनी सांगितले.
नितीश कुमार यांच्या पंतप्रधान बनण्याची क्षमता असल्याचे शरद पवार, लालूप्रसाद यादव आणि बाबूलाल मरांडी यांनी म्हटले होते. पाटण्यामध्ये एका कार्यक्रमात मुक्तपणे आपल्या भावना मांडताना नितीश कुमार म्हणाले, आयुष्यात एकदा तरी संसदेचा सदस्य होण्याची माझी इच्छा होती. पण पंतप्रधान, मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्नही मी कधी पाहिले नाही. काही लोक मला बदनाम करण्यासाठी मी पंतप्रधान बनण्याच्या पात्रतेचाच नसल्याचे सांगत आहेत. पण ते विनाकारण आपला वेळ व्यर्थ करत आहेत. पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षाही नाही.
भाजपेतर आघाडीचे नेतृत्त्व करण्याची नितीश कुमार यांच्यामध्ये क्षमता असल्याचे काही नेत्यांनी म्हटल्यावर भाजप नेत्यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. त्याला नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.