विमा विधेयकावर काँग्रेसने घूमजाव केलेला नाही. या विधेयकावर काँग्रेस भांडखोरपणाही करीत नाही. उलट सरकारचे वागणेच उद्धटपणाचे आहे. सहा वर्षे अडवून ठेवल्यानंतर आता हे विधेयक संमत करून घेण्याची भाजपला एवढी घाई का झाली आहे, असा प्रतिसवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेत मंगळवारी पक्षप्रवक्ते आनंद शर्मा यांच्यासोबत राहुल गांधीही सहभागी झाले होते. काँग्रेसने या मुद्दय़ावर दुहेरी मापदंड अवलंबलेला नाही, असे राहुल यांनी या वेळी सांगितले. तर या विधेयकावर पक्षाची भूमिका आनंद शर्मा यांनी स्पष्ट केली. सरकारचे या मुद्दय़ावरील वागणे अतिशय हेकेखोर असून या विधेयकातील तरतुदींवर छाननी समितीत चर्चा व्हावी, अशी विरोधकांनी एकत्रितपणे घेतलेली भूमिका योग्यच आहे, असे आनंद शर्मा यांनी सांगितले. छाननी समितीत चर्चा करण्याची मागणी करणे म्हणजे भांडखोरपणा करणे नव्हे. आम्ही विमा क्षेत्रात ४९ टक्केपरकीय थेट गुंतवणुकीच्या बाजूने आहोत. पण याचा अर्थ संसदीय परंपरा झुगारून हे विधेयक संमत करणे असा होत नाही, असे शर्मा यांनी बजावले. विधेयकातील दुरुस्त्यांची छाननी समितीमार्फत चर्चा करणे हा सभागृहाचा अधिकार आहे, असे शर्मा म्हणाले.