06 August 2020

News Flash

नागरिकांच्या देशभक्तीवर शंका नको!

देशातील १२५ कोटी भारतीयांच्या देशभक्तीवर शंका नाही.

नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत आवाहन ल्लसरकारविरोधात निषेध व्यक्त करणे देशद्रोह – राहुल गांधी

देशभरात वाढलेल्या असहिष्णुतेच्या घटना व त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या स्वपक्षाच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अप्रत्यक्षपणे चपराक लगावली. देशातील १२५ कोटी भारतीयांच्या देशभक्तीवर शंका नाही. त्यामुळे कुणालाही देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची गरज नसल्याचे ठोस प्रतिपादन मोदी यांनी केले. राज्यसभेत मोदींचे भाषण सुरू असताना त्याचवेळी लोकसभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहिष्णुतेच्या मुद्दय़ावर सरकारला जाब विचारत होते. सरकारविरोधात निषेध व्यक्त करणे राष्ट्रद्रोह ठरत असल्याचा घणाघाती हल्ला राहुल यांनी सरकारवर चढविला. उभय नेते वेगवेगळ्या सभागृहात बोलत होते, मात्र परस्परांच्या आरोप-प्रत्यारोपांनाच जणू काही त्यांनी उत्तर दिले.
पाकिस्तानपासून चुकीचा धडा शिकू नये. त्यांनी त्यांच्या लोकांचा आवाज दाबून टाकला. दादरी हत्याकांडावर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधानांवर राहुल यांनी कठोर शब्दात टीका केली. पंतप्रधान आर्थिक विकासाची घोषणा करतात, तर त्यांचे सहकारी सिनेतारकांना पाकिस्तानात पाठविण्याची भाषा बोलतात, असे राहुल यांनी सुनावले.
भारतीय राज्यघटनेवरील विशेष चर्चेच्या समारोपात मोदी म्हणाले की, राजकारण ‘अरे’ ला ‘का रे?’ करून चालणार नाही. सर्वानी एकत्रित काम केले तरच देशाचा विकास शक्य आहे. समता व ममता असेल तरच देशाचा विकास होईल. राज्यकर्त्यांच्या वर्तनावर मोदी यांनी मार्मिक टिप्पणी केली. ते म्हणाले की, ज्येष्ठांच्या कृतीचे आचरण केले जाते. देश आपल्याकडे पाहत आहे. त्यामुळे काही जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्याच लागतील. राज्यसभेत राज्यघटनेवरील चर्चेच्या समारोपात मोदी यांनी दलितांच्या उत्थानाची जबाबदारी आपल्या सर्वाची असल्याचे सांगून उत्तर प्रदेशमध्ये दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पायाभरणी केली.
एकतेसाठी अभिनव प्रयोग
देशाला जोडण्यासाठी मोदींनी अभिनव कल्पना मांडली. छत्तीसगडमध्ये केरळ महोत्सव साजरा व्हावा. छत्तीसगडमधील विद्यार्थ्यांना मल्याळम भाषेतील शंभर वाक्ये शिकवावीत. ही वाक्ये त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील. याशिवाय मल्याळम चित्रपट महोत्सव छत्तीसगडने आयोजित करावा. वैष्णव जन तो.. हे गीत भाषेच्या पलीकडे गेले आहे. यासारखी प्रत्येक भाषेतील तीन ते चार गीते विविध राज्यांनी देशातल्या कोणत्याही राज्याकडून शिकावी. एक भारत-श्रेष्ठ भारताची ही नवी सुरुवात असेल, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली.

समाजात जेव्हा कुणावर अत्याचार, अनाचार होतो तेव्हा तो देशावरच कलंक असतो. देशात कुणीही दलित-पददलित नाहीत. सर्व समान आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नारायण मूर्ती, पी. एम. भार्गव, रघुराम
राजन हे कोटय़वधी लोकांप्रमाणेच व्यथित आहेत. ते का व्यथित आहेत, याची चौकशी सत्ताधाऱ्यांनी करावी. – राहुल गांधी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2015 4:02 am

Web Title: no doubt the patriotism of the citizens
Next Stories
1 तूरडाळ भाववाढीवर सरकारला ६० खासदारांकडून जाब!
2 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतमोजणी आज
3 भगवान महावीर मूर्ती चोरी
Just Now!
X