कर्नाटकमध्ये ५ मे रोजी सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता जारी असल्याचे कारण देत कर्नाटक वीज नियामक आयोगाने प्रस्तावित वीज दरवाढीचा आदेश रोखून ठेवला आहे. आचारसंहितेचे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून आल्याने आम्ही वीजदरवाढीबाबतचा आदेश जारी न करण्याचे ठरविले आहे, असे कर्नाटक वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष एम. आर. श्रीनिवास मूर्ती यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. कर्नाटक आयोगाने दरवाढीचा आदेश कधी निर्गमित करावा, याबाबत केंद्रीय वीज आयोगाने मुदत निश्चित केली आहे का, असे विचारले असता मूर्ती यांनी, पत्रात तशा प्रकारचा कोणताही उल्लेख नसल्याचे स्पष्ट केले. कर्नाटकमधील सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी पाच वितरण कंपन्यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात दरवाढीसाठी स्वतंत्रपणे याचिका सादर केल्या असल्याचे कर्नाटक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कर्नाटकमध्ये गेल्या साडेतीन वर्षांत चार वेळा विजेची दरवाढ केली आहे.