सीमावादामध्ये चीनने थोडी नरमाईची भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील स्थितीमध्ये काहीही फरक प़डलेला नाही. पूर्व लडाखमधील गालवान व्हॅली आणि पँगाँग टीएसओ भागामध्ये चार ठिकाणी दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. तिथे तणावाची स्थिती अजूनही कायम आहे.

दोन्ही देशाचे सैनिक आपआपल्या जागेवर ठामपणे उभे आहेत. परिस्थिती निवळून सामान्य कधी होईल ते आताच सांगता येणार नाही असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितले. भारतालगत सीमेवर परिस्थिती स्थिर व नियंत्रणात असून दोन्ही देशात संवाद व सल्लामसलतीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत, असे चीनने बुधवारी म्हटले होते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल नरमाईचे संकेत दिले होते. पण प्रत्यक्षात ते ग्राऊंड लेव्हलवर दिसलेले नाहीत. पूर्व लडाखमध्ये चार ठिकाणी भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आहे. त्यात गालवान व्हॅली जवळ तीन भागांमध्ये आणि पँनगाँग तलावाजवळ एका ठिकाणी संघर्षाचा केंद्रबिंदू आहेत.

सीमेवर भारताकडून सुरु असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांच्या कामकाजात खोडा घालण्यासाठी चीनने इथे सैनिक संख्या वाढवली आहे. गालवान नदीजवळ भारत ६० मीटरचा पूल उभारत आहे तसेच पँगगाँग तलावाजवळील टेहळणी पोस्टचे कामकाज भारताने थांबवावे यासाठी चीनचे प्रयत्न सुरु आहेत. भारताने मात्र चीनच्या या दबावाच्या खेळीला न जुमानता आपले कामकाज चालूच ठेवले आहे. गालवान नदीजवळचा पूल हा दौलत बेग ओल्डी पर्यंत पोहोचण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या २५५ किलोमीटरच्या मार्गाचा एक भाग आहे.