ड जीवनसत्त्वामुळे अनेक शारीरिक व्याधी दूर होतात, असा दावा करून त्याच्या गोळ्यांचा मारा औषध म्हणून केला जात असला, तरी प्रत्यक्षात ड जीवनसत्त्व (सनशाइन व्हिटामिन) हे मोडलेली हाडे व्यवस्थित करण्याव्यतिरिक्त फारसे उपयोगाचे नसते, असे ऑस्ट्रेलियातील एका संशोधनात दिसून आले आहे. ड जीवनसत्त्व सूर्यप्रकाशात त्वचेखाली तयार होत असते म्हणून त्याला सनशाइन व्हिटामिन असेही म्हणतात.
ड जीवनसत्त्वाचा संबंध कर्करोग, मधुमेह व संसर्गाशी असतो असे सांगितले जात असले, तरी तसा काहीही संबंध नाही असे ऑस्ट्रेलियाच्या दोन वैज्ञानिकांनी संशोधनात म्हटले असले, तरी त्यावर अधिक अभ्यासाची गरज आहे, असे ‘एबीसी’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
रॉयल पर्थ हॉस्पिटलचे रोगनिदान तज्ज्ञ व संप्रेरक तज्ज्ञ पॉल ग्लेनडेनिंग व युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे शैक्षणिक तज्ज्ञ गेरार्ड च्यू यांनी हे संशोधन केले आहे.
ड जीवनसत्त्वाच्या अभावाने कर्करोग, मधुमेह व संसर्गाचे रोग होतात असा निष्कर्ष काढण्यापूर्वी यादृच्छिक वैद्यकीय चाचण्या मोठय़ा प्रमाणावर करण्यात आल्या नाहीत, तरीही आपण ड जीवनसत्तव पूरक म्हणून देत असतो.
काही लोकांमध्ये ड जीवनसत्त्वाची चाचणी करून ते अपुरे असल्या कारणास्तव त्यांना अकारण ते दिले जात असल्याची शक्यता आहे. कॅल्शियम व ड जीवनसत्त्व एकत्र मिळून मोडलेली हाडे भरून काढण्यास मदत करतात, विशेष करून वृद्ध लोकांना त्याचा फायदा अधिक होतो. जीवनसत्त्व ड चाचण्यांबाबत दोन हजार संशोधन लेखांचा आधार  घेण्यात आला आहे. मेडिकल जर्नल ऑफ ऑस्ट्रेलिया या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.