भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) एकाही गोदामाचा वापर दारूचा साठा करण्यासाठी करण्यात आलेला नाही. मात्र असा प्रकार उघडकीस आला तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अन्न  आणि ग्राहक व्यवहारमंत्री के. व्ही. थॉमस यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट  केले.
अन्नधान्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उत्पादनाचा साठा करण्यासाठी महामंडळाने कोणालाही एकही गोदाम उपलब्ध करून दिलेले नाही. गोदामात दारूचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली तर कठोर कारवाई केली जाईल, असे थॉमस यांनी सांगितले.
अन्नधान्याव्यतिरिक्त गोदामांमध्ये अन्य कोणत्या घटकांचा साठा करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असेल, मात्र या गोदामांमध्ये दारूचा साठा केल्याचे आपल्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहनही त्यांनी सदस्यांना केले. यंत्रणा पारदर्शक ठेवण्यासाठी प्रत्येक राज्यांत सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्याचे अध्यक्षपद ज्येष्ठ खासदाराकडे आहे. गोदामांची साठवणूक क्षमता गरजेपेक्षा अधिक असल्याचे थॉमस म्हणाले.