करोनामुळे देशात लागू करण्यात आलेली टाळेबंदी १४ एप्रिलला संपणार असली तरी त्यानंतर लगेच रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. पण ही सेवा  सुरू करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे असे रेल्वेने म्हटले आहे.

रेल्वे प्रवाशांची तापाची तपासणी रेल्वे स्थानकांवर सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. यात सरकारने सांगितलेल्या  सर्व सोपस्कारांचे पालन करण्यात येईल.

रेल्वेच्या विविध विभागांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की १५ एप्रिलपासून रेल्वे सुरू करण्याची तयारी ठेवली आहे. पण सेवा सुरू करण्याचा कुठलाही निर्णय अजून घेण्यात आलेला नाही. २१ दिवसांच्या टाळेबंदीमुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले,की कुठली रेल्वेगाडी सुरू करायची, कुठली नाही किंबहुना कुठल्या मार्गावर सेवा सुरू करायची याचा निर्णय रेल्वे मंडळ टप्प्याटप्प्याने घेणार आहे.

रेल्वे मंत्री पीयूष गोयल व रेल्वे मंडळाचे अध्यक्ष यांच्यात शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती, त्यात रेल्वे सेवा एकदम सुरू न करता ती टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे ठरवण्यात आले आहे. असे असले तरी केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्याशिवाय रेल्वे सेवा सुरू केली जाणार नाही.

नियोजन सुरू

रेल्वेच्या १७ विभागांनी कुठल्या रेल्वे कधी सुरू करायच्या याचे नियोजन सुरू केले आहे. डब्यांच्या उपलब्धतेवर ते विसंबून आहे. रेल्वे प्रवाशांची तापाची तपासणी रेल्वे स्थानकांवर सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. यात सरकारने सांगितलेल्या  सर्व सोपस्कारांचे पालन करण्यात येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की अजून कुठलेही नवीन आदेश जारी करण्यात आलेले नाहीत. १४ एप्रिलपर्यंतच रेल्वे बंद ठेवण्याचा आदेश होता, त्यामुळे १५ एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी पुन्हा नवीन आदेशाची गरज नाही. दरम्यान पुढील आठवडय़ात रेल्वे विभागांना रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतची ठोस कृती योजना पाठवली जाणार आहे. २४ मार्चला पंतप्रधान मोदी यांनी टाळेबंदी लागू करताना रेल्वेच्या प्रवासी गाडय़ा बंद करण्याचे जाहीर केले होते. मालगाडय़ांना यातून सूट देण्यात आली होती.