इंग्लंडला जाणाऱ्या भारतीयांना व्हिसाशुल्कासह महागडा बाँड बंधनकारक करण्याच्या धोरणाबाबत भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे व्हिसा बाँड लागू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे इंग्लंडने बुधवारी स्पष्ट केले. इंग्लंडचा व्हिसा हवा असणाऱ्या भारतीयांना २.७५ लाख रुपयांचा बाँड बंधनकारक करण्याचा प्रस्ताव होता.
येथील इंग्लंड उच्चायुक्तालयातील प्रसारण विभागाचे संचालक मारकस विन्सले यांनी सांगितले की, आर्थिक मंदीशी झुंजणाऱ्या इंग्लंडला उभारी घेण्यासाठी हुशार आणि होतकरू भारतीयांची गरज आहे. मात्र इंग्लंडमध्ये येणाऱ्या नागरिकांमधून अधिकाधिक चांगला पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी योग्य ती पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचाच एक भाग म्हणून आर्थिक बाँडचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, व्हिसा बाँड धोरणाबाबत निर्माण झालेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात दोन्ही देशांचे वरिष्ठ पदाधिकारी लंडन येथे भेटून चर्चा करणार आहेत.