विधानसभेचे कामकाज शुक्रवापर्यंत तहकूब; भाजपचा रात्रभर सभागृहातच ठिय्या

बंगळूरु : कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या भवितव्याचा फैसला आता शुक्रवापर्यंत लांबणीवर  पडला आहे.

विधानसभेचे गुरुवारचे कामकाज संपेपर्यंत मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करा, असे पत्र राज्यपाल वजुभाई वाला यांनी अध्यक्ष रमेशकुमार यांना दिले. असे असताना विधानसभेचे कामकाज शुक्रवापर्यंत तहकूब करण्यात आले. त्यामुळे राज्यपालांच्या प्रश्नाला अध्यक्षांनी उत्तर द्यावे आणि विश्वासदर्शक ठरावावर गुरुवारीच मतदान घ्यावे या मागणीसाठी भाजप आमदार रात्रभर सभागृहातच धरणे धरणार असल्याचे भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी सभागृह तहकूब होण्यापूर्वीच जाहीर केले.

जवळपास दोन आठवडय़ांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाटय़ानंतर गुरुवारी कुमारस्वामी यांनी विधानसभेत एका ओळीचा विश्वासदर्शक ठराव मांडला. कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावावर भाषण करण्यापूर्वीच काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने उपाध्यक्ष कृष्णा रेड्डी कामकाज शुक्रवापर्यंत तहकूब केले.

झाले काय?

सभागृहामध्ये गुरुवारी विश्वासदर्शक ठरावावर १५ मिनिटेही योग्य पद्धतीने चर्चा झाली नाही, विश्वासदर्शक ठरावाला विलंब व्हावा यासाठी सत्तारूढ आघाडीच्या सदस्यांनी वेगळेच प्रश्न उपस्थित केले, असे येडियुरप्पा म्हणाले. घटनात्मक चौकटीचा भंग झाला असल्याच्या निषेधार्थ आम्ही आता सभागृहातच झोपणार असल्याचे येडियुरप्पा यांनी जाहीर केले. दरम्यान, या ठरावावरील चर्चा आता शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे.