समाजात शांतता नांदणे गरजेचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगढमधील दंतेवाडा येथील भाषणादरम्यान व्यक्त केले. हिंसेला कोणतेही भविष्य नाही. जर चांगले भविष्य हवे असेल तर, शांततेला पर्याय नाही, असे मोदींनी म्हटले. देशातील तरूणांना रोजगार मिळवून देणे हा कायमच आमच्या सरकारचा प्राधान्यक्रम राहिलेला आहे. तसेच समाजाच्या तळातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत विकासाचा फायदा पोहचला पाहिजे, यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच नक्षलींचा प्रभाव असलेल्या दंतेवाड्याला भेट दिली आहे. दरम्यान या सभेपूर्वी नरेंद्र मोदींनी दंतेवाडा येथील शाळकरी मुलांशी संवाद साधला आणि त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरेही दिली. देशातील १२५ कोटी जनता माझ्या कुटुंबाचा भाग आहे. त्यांच्यासाठी काही करताना माझ्या मनात नेहमीच आनंदाची भावना असते. त्यामुळेच मला या सगळ्या कामाचा ताण वाटत नाही, असे त्यांनी एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. तसेच आयुष्य हे कधी यश-अपयशाच्या तराजूने तोलू नका, अन्यथा निराशा येते. त्याऐवजी ध्येय निश्चित करून वाटचाल करा. जेणेकरून कितीही अडचणी आल्यातरी आपण मार्ग्रक्रमणा करू शकतो, असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. 

तत्पूर्वी नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.  दंतेवाडा भेटीत मोदींनी नक्षलग्रस्त परिसरातील महत्त्वपूर्ण अशा विकास प्रकल्पांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. यामध्ये रावघाट ते जगदलपूर हा रेल्वेमार्ग आणि बस्तर जिल्ह्यातील स्टील प्रकल्पाचा समावेश आहे.यावेळी ते नया रायपूर येथील पोलीस मुख्यालयाचे उद्घाटनदेखील करणार होते. मात्र, या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळल्याने मोदींची याठिकाणची भेट रद्द करण्यात आली.