देशात करोनाचे रुग्ण वाढत असले तरी, समूह संसर्ग झालेला नाही. ठिकठिकाणी स्थानिक उद्रेक झाल्यामुळे तिथे करोनाचे रुग्ण जास्त आढळले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) राजेश भूषण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

अजूनही एखादा करोनाबाधित सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांना ७२ तासांमध्ये शोधून काढणे शक्य होत आहे. शिवाय, देशातील केवळ ४९ जिल्ह्यांत करोनाचे ८० टक्के रुग्ण आहेत. मग, देशात समूह संसर्ग झाला असे कसे म्हणता येईल, असा युक्तिवादही भूषण यांनी केला.

महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात या आठ राज्यांमध्ये देशातील ९० टक्के करोना रुग्ण आहेत. तर देशातील ४९ जिल्ह्यांमध्ये ८० टक्के करोनाबाधित आढळले आहेत. एकूण मृत्यूंपैकी ८६ टक्के मृत्यू महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांमध्ये झाले आहे. ३२ जिल्ह्यांमध्ये ८० टक्के मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी झालेल्या १८ व्या मंत्रिगटाच्या बैठकीत दिली.

भारतात दहा लाखांमागे ५३८ करोनाबाधित झाले तर, १५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, जगभरातील सरासरी अनक्रमे १,४५३ आणि ६८.७ असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले. भारतात करोना मृत्यूचे प्रमाण २.७५ टक्के आहे. देशातील ३,९१७ सुविधा केंद्रामध्ये ३ लाख ७७ हजार ७३७ विलगीकरण खाटा असून ३९ हजार ८२० अतिदक्षता विभागांतील खाटा उपलब्ध आहेत. १ लाख ४२ हजार ४१५ ऑक्सिजन पुरवठय़ाची सुविधा असलेल्या खाटा आहेत. २० हजार ४७ खाटांना कृत्रिम श्वसनयंत्रांची सुविधा जोडण्यात आली आहे, अशी आकडेवारीही बैठकीत देण्यात आली.

टाळेबंदीच्या शिथिलीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नियंत्रित विभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. हे विभाग नीट रेखांकित करणे, त्याची माहिती संकेतस्थळांवर देणे, तिथे सक्तीने नियमांचे पालन करणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, बफर झोन तयार करणे अशा प्राथमिकता ठरवून देण्यात आल्या आहेत, असेही हर्षवर्धन म्हणाले.

५३ टक्के मृत्यू ६० वर्षांहून अधिक वयोगटातील

एकूण करोनामृत्यूंपैकी ५३ टक्के मृत्यू ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींचे झालेले आहेत. तर १४ वर्षे वयोगटात हे प्रमाण १ टक्के, १५ ते २९ वर्षे वयोगटात ३ टक्के, ३० ते ४४ वर्षे वयोगटात ११ टक्के, तर ३२ टक्के मृत्यू ४५-५९ वर्षे वयोगटातील आहेत.

मुखपट्टी वापरणे हाच उपाय : करोनासंदर्भात विविध स्तरांवर संशोधन सुरू असून हा विषाणू हवेतून पसरू शकतो, याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने गांभीर्याने घेतलेली आहे. पण, त्यावर अधिक संशोधन केले जात असून अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. हा विषाणू हवेत बराच काळ राहतो, छोटय़ा थेंबातून त्याचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मुखपट्टी वापरणे, शारीरिक अंतर राखणे हेच उपाय प्रभावी ठरतील, असे भूषण यांनी सांगितले.