कृषी क्षेत्रास कुठलेही हानिकारक निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे सांगितले. फिक्कीच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, अलीकडे जे कृषी कायदे करण्यात आले आहेत. ते शेतकऱ्यांच्या हितासाठी असून संवाद व चर्चेस आमची नेहमीच तयारी आहे. कृषी क्षेत्रास  हानिकारक निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही.

शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवूनच सरकार काम करीत आहे. असे असले तरी शेतकरी बांधवांचे म्हणणे ऐकण्याची आमची तयारी आहे.

नवीन कायद्यांबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यात येतील. ज्या बाबींत शक्य असेल त्यात आश्वासने दिली  जातील. करोना काळात कृषी क्षेत्राने कुठलाही परिणाम होऊ न देता चमकदार कामगिरी केली आहे. कृषी उत्पादनांची सरकारने भरपूर खरेदी केली असून अन्नधान्य गोदामे भरलेली आहेत.

भारतीय सैन्याकडून शौर्याची प्रचीती

भारताच्या सैन्य दलांनी चीनच्या सैन्यास पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघारी पिटाळताना शौर्याची प्रचीती दिली, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  लष्कराची प्रशंसा केली.

फिक्कीच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की चीनच्या सैन्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न हा दोन्ही देशातील करारांचे उल्लंघन करण्यात आल्याचा पुरावाच होता. आमच्या सैन्याने पीपल्स लिबरेशन आर्मीच्या घुसखोरीस खंबीरपणे परतवून लावले.

आगामी पिढय़ांना आमच्या सैन्याच्या या शौर्याचा नेहमीच अभिमान राहील. भारतीय सैन्य दलांनी मोठय़ा धैर्याने प्रतिकार करीत हे आव्हान पेलले.