घटनापीठातील पाच न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीश हजर नसल्याने सोमवारी रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन सोमवारी युक्तिवाद करणार होते. या घटनापीठातील एक न्यायाधीश एस. ए. बोबडे सोमवारी सुनावणीसाठी हजर नाहीत, असे सुनावणीला सुरुवात होण्यापूर्वीच न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांना सांगितले.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. बोबडे यांच्यासह न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. ए. नझीर हे या पीठातील अन्य न्यायाधीश आहेत. बाबरी मशीद बांधण्यापूर्वीच अयोध्येतील वादग्रस्त जागेवर श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर अस्तित्वात होते, असे शुक्रवारी सी. एस. वैद्यनाथन यांनी पीठासमोर सांगितले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात १४ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला विराजमान या तीन पक्षकारांना २.७७ एकर वादग्रस्त जमिनीचे समान वाटप करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.