वस्तू आणि सेवा कर (GST) लागू झाल्यावर महागाई वाढेल असे अहवाल म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे, सध्याच्या करपद्धतीत वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यावर आणखी सुधारणा होईल, असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी स्पष्ट केले आहे. आज तामिळनाडूमध्ये त्या पत्रकारांशी बोलत होत्या, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार आहे. यानंतर देशातली महगाई वाढेल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हटल्या, जीएसटीची अंमलबजावणी केल्यानंतर महागाई वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त प्रसारित केले आहे.

केंद्र सरकारने वस्तूंच्या विक्रीतून मिळणारा महसूल मिळण्यासाठी वस्तू आणि सेवांवररचे कर निश्चित केले आहेत. त्यामुळे आत्ता देशात जी करप्रणाली आहे त्यामध्ये येत्या काळात आणखी सुधारणा होईल, असेही सीतारमन यांनी म्हटले आहे. ३० जूनच्या मध्यरात्रीपासून या वस्तू आणि सेवा कर लागू केला जाणार आहे. त्यामुळे आता हा कर नेमका कसा असणार आहे? याबाबत विविध प्रकारचे तर्क लढवले जात आहेत.

काही जाणकारांच्या मते केंद्र सरकारच्या महसुलात वाढ होणार असल्याने जीएसटी लागू केल्यावर महागाई वाढू शकते. मात्र केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी या प्रकारचे अहवाल आणि मते खोडून काढली आहेत. आगामी काळात जीएसटीमुळे महागाई कमी होण्यासच मदत होईल आणि देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

जीएसटी परिषदेची पुढील बैठक ३० जूनला होणार आहे. त्यानंतर त्याच मध्यरात्री जीएसटी लागू करण्यात येणार आहे. एका दिमाखदार सोहळ्यात आणि राष्टपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत जीएसटीची अंमलबजावणी देशभरात करण्यात येणार आहे, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी यासंदर्भात आधीच माहिती दिली आहे. आता निर्मला सीतारमन यांनीही जीएसटीमुळे करप्रणाली आणखी सोपी होणार असून कोणतीही महागाई वाढणार नाही उलट नियंत्रणात येईल असे आश्वासन दिले आहे.