पहिली आणि दुसरी या दोन इयत्तांच्या मुलांसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक परिपत्रक काढले आहे. ज्यानुसार या विद्यार्थ्यांना गृहपाठातून मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीने राज्यांना परिपत्रक पाठवले आहे. या परिपत्रकानुसार पहिली आणि दुसरीच्या मुलांना गृहपाठ देण्यात येणार नाही. एवढेच नाही तर या मुलांच्या दप्तराचे वजन हे जास्तीत जास्त दीड किलोपर्यंत असेल.

पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित हे दोनच विषय शिकवण्यात यावेत. तिसरी ते पाचवीच्या मुलांना गणित, भाषा आणि सामान्य विज्ञान शिकवले जावे अशाही सूचना या परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. ज्या पुस्तकांची आवश्यकता नाही अशी पुस्तकं शाळेत न आणण्याबाबतचा निर्णय शाळांना घ्यावा असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. टाइम्स नाऊ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन दोन ते तीन किलो, सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन चार किलो, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साडेचार किलो तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन पाच किलोपेक्षा जास्त असू नये असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.