हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे उत्तर देण्याची भाषा केल्याने या औषधाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या पुरवठयासाठी एकप्रकारे अमेरिकेने भारतावर दबाव टाकला. भारताने सुद्धा या औषधावरील निर्यातबंदी उठवल्यामुळे आपल्या देशात तर कमतरता निर्माण होणार नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्य मंत्रालयाने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या गोळयांची देशात अजिबात कमतरता नसून भविष्यातही कमतरता निर्माण होणार नाही असे आश्वस्त केले आहे. परिस्थितीवर उच्चस्तरीय पातळीवरुन लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले.

“हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या उपलब्धतेवर उच्चस्तरीय पातळीवरुन लक्ष ठेवण्यात येत आहे. आताच नाही भविष्यातही या औषधाची कमतरता निर्माण होणार नाही” असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतावर अवलंबून असलेल्या शेजारी देशांना व करोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांना या औषधाचा पुरवठा करण्यात येईल असे काल भारत सरकारकडून सांगण्यात आले. विरोधकांनी हे जीव वाचवणारे हे औषध सर्वप्रथम भारतीयांना मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन ही गोळी करोना व्हायरसवर अत्यंत प्रभावी ठरत आहे.