करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आगामी गणेशोत्सवानिमित्त दिल्ली सरकारने रविवारी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारणे, सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करणे आणि गणेश मंडळांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शुक्रवारी यासंदर्भात आदेश जाहिर केले आहेत. या आदेशांनुसार, या वर्षी राजधानी दिल्लीत कोणतेही धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत. दिल्लीवासियांना घरातचं आपापले सण साजरे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांची सर्व प्रमुख धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. आगामी गणेशोत्सव आणि मोहरम निमित्त मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येण्याची शक्यता असल्याने असे धार्मिक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशानुसार, गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक मंडळांना गणेश मूर्तीची मंडपात प्रतिष्ठापना करता येणार नाही. त्याचबरोबर सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी आणि मोहरममधील ताजियांसाठी परवानगी देण्यात येणार नाही.

या काळात शहरातील संवेदनशील भागात आणि कन्टेमेंट झोनमध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दिल्ली सरकाराने संबंधित विभागांना आदेश दिले आहेत की, कोणत्याही धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी लोक एकत्र येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. तसेच समाजकंटकांवर विशेष लक्ष ठेवावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नियम मोडणाऱ्यांना ५० हजारांचा दंड

दिल्ली प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून जे नियमांचा भंग करतील त्यांना ५०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. कृत्रिम तलावात यावेळी गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही. करोनाचं संक्रमण होऊ नये यासाठी गर्दी करता येणार नाही, असेही प्रशासनाने म्हटले आहे. नागरिकांना घरातच बादली किंवा भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात गणेश विसर्जन करण्यात यावे अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.