ब्रुसेल्स विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये एकही भारतीय जखमी झालेला नसल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्समधील विमानतळावर मंगळवारी सकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये दहापेक्षा जास्त जण मृत्युमुखी पडले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांनंतर युरोपियन युनियनच्या प्रशासकीय कार्यालयापासून जवळच असलेल्या मेट्रो स्थानकावरही स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटांमध्ये सापडलेल्या नागरिकांमध्ये कोणी भारतीय आहेत का, याचा शोध भारतीय दूतावासाकडून घेण्यात येतो आहे. पण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकही भारतीय या स्फोटात जखमी झालेला नाही.
पॅरिसमध्ये गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एका संशयित आरोपीला चार दिवसांपूर्वी बेल्जियमच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर हे स्फोट झाल्यामुळे सुरक्षायंत्रणा त्या दिशेने तपास करीत आहेत. बेल्जियममधील पोलीस आणि लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी गस्तही वाढविण्यात आली आहे.