News Flash

करोना योद्ध्यांचे विमा ‘कवचकुंडल’ काढले!

डॉक्टरांसाठीची तरतूद केंद्र सरकारकडून रद्द

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: PTI/Arun Sharma)

महाभारताच्या युद्धात कवचकुंडलांमुळे कर्णाचं सामर्थ्य अबाधित ठरेल, हे ओळखून ती कवचकुंडले दान स्वरुपात मागून हिरावली गेली. त्याचीच पुनरावृत्ती करोना युद्धात होताना दिसत आहे. स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता करोना युद्ध लढणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांसाठी केंद्र सरकारने दिलेले ५० लाखांचे विमाकवच आता करोना युद्ध तीव्र झाले असतानाच ते कवच आता तडकाफडकी केंद्र सरकारकडूनच काढून घेण्यात आले आहे.

नक्की वाचा >> “करोनाविरुद्ध लढ्यात पंतप्रधान मोदी दिवसातील १८-१९ तास काम करतायत, करोनावरुन राजकारण करु नका”

करोनाच्या दुसर्या लाटेने आता संपूर्ण देशाला ग्रासायला सुरुवात केली आहे. हजारोंच्या संख्येने माणस मरत आहेत. स्मशानात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. दोन लाखांहून अधिक करोना रुग्ण रोजच्या रोज सापडत असून या युद्धातील बचावाचे मुख्य अस्त्र असलेल्या ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांमध्ये खाटा मिळणे अवघड होऊन बसले आहे. अशा भिषण परिस्थितीत करोना योद्धा असलेले डॉक्टर व सर्व आरोग्य कर्मचारी निकराचा लढा देत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता हे योद्धे रुग्णसेवा करत आहेत. हे युद्ध लढत असताना उद्या आपल्याला विरगती प्रप्त झाली तर आपल्या कुटुंबीयांचे काय होणार हा प्रश्न अनाहूतपणे त्यांच्या डोक्यात येणे स्वाभाविक आहे. केंद्र सरकारनेही याचा विचार करून करोनाच्या पहिल्या लाटेत या डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांसाठी ‘ प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज’ अंतर्गत आरोग्य कर्मचार्यांसाठी विमा योजना जाहीर केली. ३० मार्च २०२० रोजी ९० दिवसांसाठी आरोग्य कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास ५० लाखांचे विमा कवच जाहीर करण्यात आले. करोना युद्ध लांबणार असे स्पष्ट होताच केंद्र सरकारने या ५० लाखांच्या विमा कवच योजनेला २४ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली. ही मुदत संपत असताना करोनाच्या दुसर्या लाटेने पेट घेतला आहे. रोजच्या रोज लाख लाख रुग्ण सापडत आहेत तर हजारोंचे मृत्यू होत आहेत. अशावेळी करोना युद्धातील डॉक्टर व आरोग्य रक्षकांना अधिकचे म्हणजे एक कोटी रुपयांचे विमा कवच मिळणे अपेक्षित असताना असलेले ५० लाखांचे विमा कवच काढून घेण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. केंद्र सरकारने यात एकच गोष्ट केली ती म्हणजे हा ५० लाखांचा विमा ज्या मृत आरोग्य कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे त्यांना त्यासाठी जी कागदपत्रे विमा कंपनीकडे दाखल करायची आहेत, त्याची मुदत २४ मार्च २०२१ च्या मध्यरात्री संपत होती ती वाढवून २४ एप्रिलपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची व्यवस्था केली आहे. याबाबतचे पत्रच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पाठवले आहे. ते पत्रच ‘लोकसत्ता’ला मिळाले आहे.

नक्की वाचा >> वाईटात चांगलं : आता महाराष्ट्रात करोना रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता कमी, कारण…

करोनाच्या दुसऱ्या लाटेने हलकल्लोळ माजवला असून डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांसाठी हे युद्ध दिवसेंदिवस अवघड होत असताना त्यांची विमा कवचकुंडले काढून घेतल्यामुळे या आरोग्य सैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘उद्या आमच्या मागे कुटुंबाचे, मुलाबाळांचे कसे होणार?’, ही भिती या आरोग्य सैनिकांमध्ये निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत किती डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांचे मृत्यू आजपर्यंत झाले याची कोणतीही अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. केंद्रीय सचिवांच्या पत्रात २८७ आरोग्य कर्मचार्यांचे विमा मंजूर झाल्याचा उल्लेख आहे.

याबाबत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे राष्ट्रीय सचिव डॉ जयेश लेले यांना विचारले असता देशभरात आमच्या माहितीप्रमाणे ७४८ डॉक्टरांचे मृत्यू झाले आहेत. यातील ३१२ हे खाजगी जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर असून करोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी सरकारने डॉक्टर अत्यावश्यक सेवेत येत असल्याने दवाखाने तात्काळ उघडा अन्यथा कारवाई करू असा फतवाच काढला होता. बहुतेक जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर हे साठीपुढील होते व त्यांचेच करोनायुद्धात मृत्यू झाले. मात्र हे खाजगी व्यवसाय करणारे असल्याने त्यांना विमा कवच नाकारले गेले, असे डॉ जयेश लेले म्हणाले. आमच्या संघटनेने स्वतंत्रपणे निधी उभारून आठ डॉक्टरांना प्रत्येकी दहा लाखांची मदत केली.

नक्की वाचा >> कुंभ असो वा रमजान, कुठेच करोनासंदर्भातील नियम पाळले गेले नाहीत; शाह यांनी व्यक्त केली नाराजी

‘आयएमए’चे महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे म्हणाले, महाराष्ट्रात ७२ डॉक्टरांचे करोनामुळे मृत्यू झाले. यातील ४८ डॉक्टर आयएमए’चे सदस्य होते. मात्र खाजगी सेवा करतात म्हणून बहुतेक डॉक्टरांना केंद्र सरकारने विमा कवच नाकारले आहे. आम्ही याबाबत केंद्र व राज्याकडे पाठपुरावा केला मात्र ही योजना शासकीय सेवेत असलेल्यांसाठी असल्याचे सांगण्यात आले. कित्येक खाजगी डॉक्टरांनी सरकारच्या विनंतीनुसार शासकीय सेवेत काम केले असून त्यांनाही विमा कवच मिळालेले नाही, असे डॉ भोंडवे यांनी सांगितले. राज्याचे माजी आरोग्य संचालक व करोनाविषयक मुख्य सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी केंद्राचा हा निर्णय दुर्दैवी व असंवेदनशील असल्याचे सांगितले. दुसरी लाट ही गंभीर असल्याची जाणीव केंद्रातील मंडळींना आहे का, असा सवालही त्यांनी केला. करोनाच्या पहिल्या लाटेत ९० हजार रुग्ण सापडताच केंद्राने डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर केले. आता तर दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडत असताना हे विमा कवच रद्द करून केंद्र सरकार डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांना काय संदेश देऊ पाहात आहे, असा मुद्दा डॉ. साळुंखे यांनी उपस्थित केला. सर्व राज्यात करोना वेगाने पसरत असताना दिवसरात्र जीवाची बाजी लावून लढणार्या आरोग्य कर्मचार्यांना किमान एक कोटी रुपयांचे ‘विमा कवच’ मिळणे अत्यावश्यक असताना त्यांची दिलेली ‘कवचकुंडले’ काढून घेणे ही असंवेदनशीलतेची परिसीमा असल्याची टीका डॉ. सुभाष साळुंखे यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 1:08 pm

Web Title: no insurance cover for covid 19 healthcare workers modi government conclude garib kalyan package scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर
2 देशभरात लॉकडाउन होणार का?; अमित शाहांचं मोठं विधान
3 करोना रुग्णसंख्येचा विस्फोट; तीन लाखांकडे वाटचाल…. मृत्यू संख्येत मोठी वाढ
Just Now!
X