काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी राजकीय सूडापोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप केला असतानाच हरयाणा सरकारने वढेरा यांच्या चौकशीत सरकारचा हस्तक्षेप नसल्याचे सांगितले, पण वढेरा यांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत, असेही सरकारने स्पष्ट केले.
हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांनी सांगितले की, वढेरा यांनी आतापर्यंत जे मिळवले आहे ते राजकारणातूनच मिळवले आहे, चौकशीबाबत त्यांचे काही म्हणणे असेल तर सरकारचा त्यात हस्तक्षेप नाही. त्यांच्या जमीन व्यवहारांची चौकशी आयोग करीत आहे. त्यात सरकारचा संबंध नाही. वढेरा यांच्या जमीन परवाने व कंपन्यांची चौकशी एस. एन. धिंग्रा आयोग करीत आहे. गुरगावच्या चार खेडय़ांत वढेरा यांच्या मालमत्ता व कंपन्या आहेत. जर आयोगाने वढेरा यांना दोषी ठरवले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. राजकीय वापर केला जात आहे, असा आरोप वढेरा यांनी केला होता.