काही सरकारी पदांसाठी मुलाखती घेण्याची प्रथा बंद करण्यात येईल त्यात विशेषत कनिष्ठ स्तरावरील पदांचा समावेश असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले. त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणातही ही घोषणा केली होती.
कनिष्ठ पदांसाठी मुलाखती घेण्यामुळे भ्रष्टाचाराला उत्तेजन मिळते असे मतही मोदी यांनी व्यक्त केले. गेल्या पंधरा दिवसात सरकारी यंत्रणेने या निर्णयाच्या दिशेने वेगात पावले टाकली आहेत असेही त्यांनी नमूद केले. जेव्हा मुलाखतीला बोलावले जाते तेव्हा त्या उमेदवाराच्या आई-वडिलांना शिफारशीसाठी भटकावे लागते तसेच वशिला लावावा लागतो. त्यामुळे कनिष्ठ स्तरावरील पदांच्या मुलाखतींमुळे भ्रष्टाचार होतो. त्यामुळे निदान काही पदे तरी मुलाखतीशिवाय भरली जातील. अवघ्या पंधरा दिवसात सरकारी यंत्रणा वेगाने हलली आहे. त्याचे संदेश पाठवण्यात आले असून लवकरच त्याचा परिणाम दिसेल. आता लोकांना शिफारशी आणण्यासाठी पळापळ करावी लागणार नाही त्यामुळे छळही थांबेल व भ्रष्टाचारही कमी होईल. देशवासीयांकडून ट८ॅ५.्रल्ल वर आपण सूचना मागविल्या आहेत.

मोदी म्हणाले..

’काही दिवसांपूर्वी सूफी परंपरावाद्यांना भेटायची संधी मिळाली. यावरून त्यांच्यात अदबीने बोलण्याची, नम्रतेची चुणूक दिसली. सूफी संगीतातील प्रेम, उदारपणा जगभर पोहचेल अशी अपेक्षा आहे.
’डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील इंदू मिलमधील स्मारकाचा मुद्दा बऱ्याच वर्षांपासून रखडला होता. महाराष्ट्रातील नव्या सरकारने तो झटपट मार्गी लावला. तसेच लंडन येथील डॉ. आंबेडकरांचे घर खरेदी केल्याने तेथे जाणाऱ्या प्रत्येक भारतीयाला ते प्रेरणा देत राहील. या दोन्ही गोष्टींबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन.