कोटय़वधी नोकरदारांच्या निवृत्तीनंतरचे आशास्थान असलेल्या भविष्य निर्वाह निधीतील तब्बल ६ लाख कोटी रुपयांची रक्कम शेअर बाजारात गुंतविण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे आज स्पष्ट करण्यात आले.
भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त के. के. जालान यांनी पीटीआयशी बोलताना बुधवारी ही प्रतिक्रिया दिली. शेअर बाजारात पैसे गुंतविण्याशिवाय भविष्य निर्वाह निधीला पर्यायच नाही, अशा आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पाश्र्वभूमीवर जालान यांनी हे स्पष्टीकरण दिले.
भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्तांच्या बैठकीत अर्थ मंत्रालयाच्या या संदर्भातील प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. भविष्य निर्वाह निधीचा निधी शेअर बाजारात गुंतविण्याच्या बाजूने विश्वस्त नाहीत, असा निर्वाळा जालान यांनी दिला.
मात्र, भविष्य निर्वाह निधीतील निधी केंद्र सरकारच्या रोख्यांमध्ये अधिक प्रमाणात गुंतविण्यासाठी अधिक लवचीक धोरण अंगीकारले जावे, असा निर्णय श्रम मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘केंद्रीय विश्वस्त मंडळ’ या भविष्य निर्वाह निधीच्या सर्वोच्च यंत्रणेने घेतला आहे.
या निधीला अधिकाधिक परतावा मिळावा यादृष्टीने तो शेअर बाजारात गुंतवला जावा, असा केंद्रीय अर्थमंत्रालयाचा आग्रह आहे. परंतु शेअर बाजाराच्या बेभरवशीपणामुळे बहुतांश कामगार संघटनांचा असे करण्यास तीव्र विरोध आहे.