थेट भरती प्रक्रियेतून राजस्थान शासनामध्ये नोकरी मिळविण्याच्या इच्छा असणाऱ्यांना आता सक्तीने सिगरेट – गुटखासारख्या तंबाखूजन्य पदार्थापासून लांब राहावे लागणार आह़े  कारण आता या भरती प्रक्रियेत अर्ज करताना उमेदवाराला अर्जासोबत धूम्रपान करत नसल्याचे आणि गुटखाही खात नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आह़े
राज्य शासनाचे सर्व विभाग, महापालिका, लोकसेवा आयोग आणि जिल्हाधिकारी यांना सरळ सेवेद्वारे भरतीच्या वेळी असे प्रतिज्ञापत्र उमेदवारांकडून घेण्याचे आदेश राज्याचे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने दिले आहेत़
राज्य शासनाने हा निर्णय गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच घेतला आह़े  परंतु, त्यानंतर लगेचच जाहीर झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती़  
 नुकतेच २३ एप्रिल रोजी पाच वीज कंपन्यांच्या संयोजन समितीने या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मान्य केल़े  त्यामुळे आता विद्युत निगम, राज्याचे ऊर्जा खाते या ठिकाणी तरी थेट भरतीच्या वेळी उमेदवारांकडून असे प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितल़े
भारतीय अस्थमा निवारण समितीचे सरचिटणीस धरमवीर काटेवा यांनी राजस्थान शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि अशाच प्रकारे अल्कोहोलबाबतही निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आह़े