अमृतसरमधील जोडा रेल्वेफाटक अपघातामध्ये ६१ जणांना प्राण गमवल्यानंतरही स्थानिकांनी या घटनेतून कोणताच धड घेतलेले दिसत नाही. देशाला हदरवणाऱ्या दसऱ्यानिमित्त आयोजित रावणदहन कार्यक्रमातील दुर्घटनेला एक महिना पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदा स्थानिकांनी छट पूजेनेनिमित्त रेल्वे ट्रॅकवर गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

मंगळवारी संध्याकाळी देशभरामध्ये छट पूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र पंजाबमधील भटिंडाजवळ स्थानिकांनी रेल्वे मार्गाला लागून असणाऱ्या श्रींडी कालव्याच्या किनारी छट पूजा साजरी करण्यासाठी रेल्वे मार्गावर गर्दी केली. स्थानिक पोलिसांनी काही आठवड्यांपूर्वीच अमृतसरजवळ घडलेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांना धार्मिक विधी साजरा करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर न जाण्याचा इशारा दिला होता. दिवसाला १२ हून अधिक लांब पल्ल्यांच्या ट्रेन जाणाऱ्या या ट्रॅकच्या आजूबाजूला छट पूजेनिमित्त गर्दी करु नये असे आवाहन रेल्वेनेही केले होते. मात्र या सर्व सूचनांकडे दूर्लक्ष करत अनेक महिलांनी तसचे त्यांच्या सोबत उपस्थित असलेल्यांनी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या कालव्याच्या किनारी छट पूजा करताना रेल्वे ट्रॅकवर उभे राहतच ही पूजा केली.

जोडा रेल्वेफाटक येथे घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रेल्वेने अतिरीक्त सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती. मात्र छट पूजेच्या काळात भटिंडा-मालाउट या ट्रॅकवरून एकही रेल्वे गाडी गेली नाही. भाविकांनी रेल्वे ट्रॅकवर जाऊ नये म्हणून आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र ते आमची कोणतीही गोष्ट ऐकून घेण्यास तयार नव्हते असे माहिती भटिंडा जीरापीचे स्टेशन हाऊस ऑफिसर असणाऱ्या हरजिंदर सिंग यांनी दिली. आम्ही तेथे अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. तसेच मोटरन्सला या भागातून जाताना ट्रेनचा वेग कमी करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही सिंग यांनी सांगितले. लोकांनी अपघातामधून धडे घ्यायला हवे. ट्रॅकवर उभे राहून आपला जीव धोक्यात टाकू नये अशी अपेक्षा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.