अनलॉक ४ च्या नियमावलीनुसार, कन्टेन्मेंट झोन आणि लॉकडाउनबाबत केंद्रानं राज्यांना महत्वपूर्ण सूचना केली आहे. त्यानुसार, केंद्र सरकारला विचारल्याशिवाय राज्यांनी कन्टेंन्मेंट झोनबाहेर स्वरुपातील लॉकडाउन लावता येणार नाही, असे निर्देश केंद्राने राज्यांना दिले आहेत. त्यामुळे आता केंद्राच्या परवानगीशिवाय राज्यांना स्थानिक पातळीवर लॉकडाउन करता येणार नाही.

केंद्राने शनिवारी अनलॉक ४ ची प्रक्रिया आणि नियमावली जाहीर केली. यामध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यास ७ सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. तर सामाजिक, सांस्कृतीक, धार्मिक, शैक्षणिक, खेळ आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये १०० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. २१ सप्टेंबरपासून हा नियम लागू होणार आहे.

अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असल्यानं केंद्र सरकारकडून अनलॉक ४ मध्ये नवीन नियमावली जाहीर केली आहे. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं धार्मिक सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. तर शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्यात आली आहेत. परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

हे राहणार बंद…

अनलॉक ४ मध्ये चित्रपटगृहांसह स्विमिंग पूल (जलतरण तलाव), आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा (विशेष विमान सेवा वगळून) सप्टेंबरमध्येही बंदच राहणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारनं शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.