‘जे लोक हिंदी भाषेचा विरोध करतात ते देशावर प्रेम करत नाही,’ असे वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देब यांनी केले आहे. मी इंग्रजीचा विरोध नाही किंवा हिंदी एखाद्यावर लादली पाहिजे असेही माझे मत नाही मात्र हिंदीला होणारा विरोध न पटण्यासारखा असल्याचे देब म्हणाले आहेत. हिंदी भाषा मोठय़ा प्रमाणात बोलली जात असल्याने तीच देश एकसंध ठेवू शकते, असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक देश, एक भाषा’ असा संकेत हिंदी दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर देब यांनी हे मत नोंदवले आहे.

‘राष्ट्रभाषा म्हणून लोक हिंदीला विरोध करत आहेत. हे हिंदीला विरोध करणारे लोक असे लोक आहेत ज्यांचे देशावर प्रेम नाही. मी राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचे समर्थन करतो कारण देशातील बहुतांश लोक हिंदी बोलतात,’ असं देब म्हणाले. ‘इंग्रजांनी देशामध्ये २०० वर्ष राज्य केले नसते तर देशातील सर्वाधिक कार्यालयांमध्ये इंग्रजीचा आज होतो तितका वापर झाला नसता,’ असं देब यांनी म्हटले आहे. अधिकृत भाषा कायदा १९६३ नुसार केंद्र सरकार आणि संसदेमध्ये हिंदी आणि इंग्रजी ही अधिकृत भाषा आहे. घटनेतील आठव्या कलमानुसार देशात एकूण २२ अधिकृत भाषा आहेत.

हिंदीमुळे देश एकत्र आला आहे या अमित शाह यांच्या वक्तव्याचे देब यांनी समर्थन केले आहे. ‘वसाहतवादाच्या काळात असलेल्या नियमांप्रती निष्ठा दाखवणाऱ्यांसाठी इंग्रजी हा अनेकांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. केवळ इंग्रजी बोलल्या जाणाऱ्या देशांची प्रगती होते असं चित्र दिसत नाहीत. असं असतं तर जर्मनी, चीन, जपान, रशिया आणि इस्त्रायल सारखे देश प्रगत देश नसते,’ असे मत देब यांनी व्यक्त केले आहे.

नक्की वाचा >> कानडी, मल्याळमसाठी मुख्यमंत्री आले पुढे, फडणवीस मराठीसाठी करणार का शाह यांना विरोध?

सरकारी अधिकाऱ्यांनी इंग्रजी येत नसणाऱ्यांना सरकारी कामकाजामध्ये मदत केली पाहिजे अशी इच्छा देब यांनी बोलून दाखवली. ‘सरकारी कार्यालयामध्ये कोणतेही काम घेऊन येणारे नागरिक जेव्हा बंगाली किंवा कोकबोरोक (त्रिपुरातील स्थानिक भाषा) भाषेत बोलतात तेव्हा अधिकारी त्यांना मदत करण्यासाठी पुढे येत नाही. मात्र हेच स्थानिक भाषेऐवजी इंग्रजीत बोलल्यास लगेच अधिकारी मदत करतात. हे चुकीचे असून असं होता कामा नये,’ अशी अपेक्षा देब यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते शाह

‘प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा वापर केला पाहिजे, पण त्याचबरोबर देशाच्या विविध भागांमध्ये हिंदीचाही प्रसार झाला पाहिजे. देशात अनेक भाषा आहेत, त्यांचे वेगळे महत्त्व आहे. पण संपूर्ण देशाची भाषा एक असली पाहिजे. तीच जगात देशाची ओळख बनू शकते. देशाला एकसंध ठेवणारी भाषा कोणती असेल तर ती हिंदी आहे. त्यामुळे लोकांनी मातृभाषेबरोबरच हिंदीचा वापर करून बापू आणि सरदार (गांधी व वल्लभभाई) यांचे ‘एक भाषा’ हे स्वप्न साकार करावे,’ असे ट्विट शाह यांनी हिंदी भाषा दिनानिमित्त केले होते.

शहा यांनी हिंदी दिनाच्या कार्यक्रमातही हिंदीच्या वापराबाबत मते मांडली. हिंदी भाषा प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. पुढील वर्षी देशाच्या विविध भागांत हिंदी दिनाचे कार्यक्रम केले जातील. आई-वडिलांनी मुलांशी मातृभाषेत बोलावे आणि हिंदीचाही वापर करावा. २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हिंदीची स्थिती खूप सुधारलेली असेल, असे शाह म्हणाले. लोकशाहीत सरकारी कामकाजाची भाषा लोकांना समजणारी असावी, असे राममनोहर लोहिया यांचे मत होते. गृह मंत्रालयाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर दहा दिवसांत आपण हिंदी भाषेचा पुरस्कार केला. त्यानंतर एकही फाईल हिंदी नोंदीशिवाय आली नाही. साठ टक्के फाईलवरच्या नोंदी आता हिंदीतच असतात. नव्या पिढीने भाषेचा वापर केला तरच ती टिकू शकते. अनेक भाषा आणि बोलीभाषा हेच आपले सामथ्र्य आहे. त्याचा अभिमानच वाटतो, असे प्रतिपादन शाह यांनी केले. परदेशी भाषांनी मूळ भारतीय भाषांवर अतिक्रमण करता कामा नये. हिंदी माध्यमातील मुलाला ४० मिनिटे हिंदीतून बोलायला सांगितले तर तो बोलू शकत नाही, कारण इंग्रजीचा प्रभाव मोठा आहे. इंग्रजीच्या मदतीशिवाय आपण हिंदी बोलू शकत नाही. ईशान्येकडील मुलांना हिंदी लिहिण्यावाचण्यास शिकवण्याचे काम सुरू आहे. गेल्या आठवडय़ात गुवाहाटी येथे असताना खासगी शिक्षक नेमून मुलांना हिंदी शिकवण्यात येत असल्याचे समजले. आता सरकारच या मुलांना हिंदी शिकवण्याची व्यवस्था करील, असेही शाह यांनी स्पष्ट केले. वाजपेयी, स्वराज यांची हिंदी भाषणे : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदीतून भाषणे केली होती. स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांना हिंदीतून माहितीपत्रे काढण्यास सांगितले होते. त्या नेहमी हिंदीतून ट्वीट करीत असत. १९४९ मध्ये १४ सप्टेंबरला घटनासभेने हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा दिला होता. १९५३ मध्ये पहिला ‘हिंदी दिवस’ पाळण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.