नवी दिल्ली : बालाकोट येथे जैश ए महंमदच्या दहशतवादी तळावर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यातून भारताच्या लष्करी कारवाई मोहिमातील मूलभूत बदल सामोरे आले आहेत, असे मत माजी हवाई दल प्रमुख एअर मार्शल बी.एस.धनोआ यांनी व्यक्त केले. बालाकोट हवाई हल्ल्यांना एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने ते बोलत होते.

त्यांनी सांगितले की, बालाकोट येथे भारताने जे हवाई हल्ले केले त्यातून भारताच्या लष्करी कारवाई मोहिमांच्या स्वरूपातील बदल दिसून आले. पाकिस्तानला भारत आत घुसून हल्ले करील यावर कधीच विश्वास बसला नसता पण ते आम्ही करून दाखवले. पाकिस्तानात बालाकोट येथे दहशतवादी प्रशिक्षण छावणीवर भारतीय हवाई दलाने हा यशस्वी हल्ला केला होता.

बालाकोट येथील हवाई हल्ल्यास आता वर्ष पूर्ण झाले आहे. आता आम्ही मागे वळून पाहताना समाधानी आहोत. त्या मोहिमेतून आम्ही बरेच धडेही शिकलो आहोत. बालाकोट हल्ल्यानंतर अनेक नवीन गोष्टींची अंमलबजावणी करण्यात आली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानच्या जैश ए महंमदच्या दहशतवाद्यांनी १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान हुतात्मा झाले होते त्याचा बदला घेण्यासाठी भारताने १२ दिवसांनंतर बालाकोट येथे जैशच्या प्रशिक्षण छावणीवर हल्ला केला होता. एअर मार्शल धनोआ हे गेल्या सप्टेंबरमध्ये निवृत्त झाले असून त्यांनी सांगितले की, एप्रिल मे महिन्यात त्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी हल्ले करण्यापासून दहशतवाद्यांना परावृत्त करण्यात बालाकोट हल्ल्यांमुळे यश आले, कारण या हल्ल्यांमुळे त्यांच्या मनात धाक निर्माण झाला. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर एकही मोठा दहशतवादी हल्ला निवडणुकांच्या वेळी  झालेला नाही. कारण असे हल्ले केले तर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल याची खात्री त्यांना पटली.

लष्करी दले सीमा ओलांडून कारवाई करतील – राजनाथ सिंह</strong>

नवी दिल्ली : दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या भारताच्या धोरणात आता मोठा बदल झाला असून आता आमची लष्करी दले देशाचे रक्षण करण्यासाठी सीमा ओलांडून कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बालाकोट हवाई हल्ल्यांच्या वर्षपूर्तीनिमित्त सांगितले. गेल्या वर्षी २६ फेब्रुवीराला पुलवामाच्या १४ फेब्रुवारीच्या हल्ल्यातील ४० जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे दहशतवादी छावण्यांवर हल्ले केले होते.  दहशतवादविरोधात भारताच्या धोरणात मोठे बदल केल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत. २०१६ मधील लक्ष्यभेद हल्ले व बालाकोटमधील २०१९ चे हवाई हल्ले हे या धोरणात्मक बदलाचे निदर्शक आहेत. आताचा भारत नवीन व आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे, असे सिंह यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.