सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (CAA) देशभरातील वातावरण सध्या तणावपूर्ण बनले आहे. दिल्ली आणि परिसरात ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना सुरु आहे. या घटनांवरुन विरोधकांनी मोदी सरकारला कोंडी पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “तुम्ही कितीही विरोध करा, सरकार या कायद्याची अंमलबजावणी करणारच,” असे त्यांनी म्हटले आहे.

दक्षिण दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना शाह विरोधकांना उद्देशून म्हणाले, “तुम्हाला पाहिजे तितका राजकीय विरोध करा पण नरेंद्र मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. तसेच मी त्या लोकांना हे निश्चितपणे सांगू इच्छितो जे इतक्या वर्षांपासून भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या आपल्या अधिकारांपासून वंचित राहिले आहेत, त्यांना ते दिले जाईल.”

गृहमंत्र्यांनी विरोधकांना हे आव्हान दिले त्याचवेळी पूर्व दिल्लीच्या सीलमपूरमध्ये शेकडो लोक नागरिकत्व कायद्यातील बदलांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. काही वेळातच आंदोलक हिंसक बनले आणि त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांवर दगड आणि बाटल्या फेकल्या. त्यानंतर त्यांना पळवून लावण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून प्रत्युत्तर द्यावे लागले.

दरम्यान, शाह काही तासांपूर्वीच दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणाले होते की, सर्व विरोधक लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हे समजावण्याचा प्रयत्न केला की, सुधारित नागरिकत्व कायद्याद्वारे कोणत्याही अल्पसंख्यांक व्यक्तीचे नागरिकत्व परत घेण्यात येणार नाही. या कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही.