डीडीसीए घोटाळ्याच्या चौकशीसाठी दिल्ली सरकारने नेमलेल्या आयोगाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात एकही पुरावा सापडलेला नाही.
डीडीसीए घोटाळ्याबाबत आप सरकारने जेटलींवर थेट हल्लाबोल केला होता. दिल्ली सरकारने डीडीसीए घोटाळ्याच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने या मुद्द्यावर अहवालही सादर केला. समितीने सादर केलेल्या २३७ पानी अहवालात डीडीसीए घोटाळ्याच्या तपासाचा उल्लेख आहे, पण जेटलींच्या नावाचा मात्र कुठेही उल्लेख नाही.  डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना जेटली यांनी कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केल्याचे एकही प्रकरण चौकशी समितीच्या निदर्शनास आलेले नाही.  आयोगाचा हा अहवाल केजरीवालांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दोन आठवडयांपूर्वी सीबीआयने दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर छापा मारल्यानंतर आपने डीडीसीए घोटाळयाची फाईल ताब्यात घेण्यासाठी छापा मारल्याचा दावा केला होता. डीडीसीए घोटाळ्याची फाइल नेण्यासाठी याठिकाणी रेड टाकण्यात आली होती. कारण त्यात अरुण जेटली अडकणार आहेत असा आरोप आपने केला होता.