News Flash

मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्यात खोडा घालणाऱ्या चीनबद्दल आनंद महिंद्रा म्हणतात…

चीनने केला नकाराधिकाराचा वापर

मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्यात खोडा घालणाऱ्या चीनबद्दल आनंद महिंद्रा म्हणतात…
आनंद महिंद्रांचे ट्विट

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतीय चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी ट्विटवरुन यासंदर्भात आपलं मत व्यक्त केले असून चीनच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करणाऱ्यांमध्ये अनेक बड्या नावांचाही समावेश आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनीही यासंदर्भात ट्विट करुन आपले मत मांडले आहे.

आनंद महिंद्रा हे ट्विटवर खूपच अॅक्टीव्ह असून ते अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि महत्वाच्या घडामोडींवर आपले मत स्पष्टपणे व्यक्त करत असतात. आजही त्यांनी ट्विटवरुन मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा खोडा घालणाऱ्या चीनसंदर्भात एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा म्हणतात, ‘मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावास विरोध करण्यासारखे कोणतेही नैतिक आणि तर्कशुद्ध कारण नाहीय. भारत आणि चीनमधील संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांसाठी हे निराशाजनक आहे. या विरोधाला भारताने कशापद्धतीने प्रतिसाद द्यायला हवा?’

आनंद महिद्रांच्या ट्विटमधील, ‘या विरोधाला भारताने कशापद्धतीने प्रतिसाद द्यायला हवा?’ या प्रश्नाला अनेकांनी चीनमधील उत्पादने वापरणे बंद करायला हवे असे उत्तर दिले आहे.

मसूदला पाठिंबा देणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी चीनी वस्तूंचा वापर बंद करा असे मत अनेकांनी ट्विटवर मांडले आहे. #BoycottChineseProducts हा हॅशटॅग सध्या ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत आहे.

दरम्यान पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी जैशने घेतल्यानंतर फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन या देशांनी भारताची बाजू घेत २७ फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव मांडला होता. समितीच्या सदस्यांना या प्रस्तावास आक्षेप घेण्याबाबत १० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही कालमर्यादा बुधवारी संपली. त्यानंतर समिती सदस्यांच्या मताच्या आधारे याबाबत निर्णय घेण्यात आला. अपेक्षेनुसार चीनने या प्रस्तावासंदर्भात नकाराधिकार वापरला. चीनने या प्रस्तावाला विरोध करताना पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीचा मुद्दा उपस्थित केल्याचे समजते.

मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठीच्या प्रस्तावाची मुदत १३ मार्चला संपणार होती. त्याआधीच भारताने अनेक देशांच्या प्रतिनिधींना भेटून मोर्चेबांधणी केली होती. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने या वेळी त्याला वेगळे महत्त्व होते. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टन येथे अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेऊन चर्चा केली होती, त्यात दहशतवादाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. भारताच्या मोर्चेबांधणीला यशही आले होते. पण चीनने खोडा घातल्याचे समोर आले आहे. १० हून अधिक देशांनी या प्रस्तावात भारताची साथ दिल्याचे समजते.

चीनकडून नकाराधिकाराचा चार वेळा वापर

चीनने मसूद अझहरसाठी नकाराधिकाराचा वापर केल्याची ही चौथी वेळ आहे. चीन हा सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असून पाकिस्तानसोबत चीनचे चांगले संबंध आहे. यापूर्वी चीनने अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर २००९, २०१६, २०१७ असा तीनदा नकाराधिकार वापरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 9:40 am

Web Title: no moral rationale for blocking this proposal says anand mahindra china block proposal against masood azhar
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 वडील मृत नाही तर योगनिद्रेत असल्याचा पोलीस अधिकाऱ्याचा दावा, दोन महिन्यांपासून करतोय उपचार
3 हिंमत असेल तर मोदींनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी, ममता बॅनर्जींचे आव्हान
Just Now!
X