दिल्लीतील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यापुढे तेथे डिझेलवर चालणाऱ्या नवीन वाहनांची नोंदणी करता येणार नाही व दहा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या परवान्यात वाढ केली जाणार नाही, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे.
सम-विषम क्रमांकाच्या वाहनांची योजना लागू करून दर दिवशी निम्मीच वाहने रस्त्यावर येऊ देण्याच्या निर्णयाने काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा दिल्लीतील जुन्या व नव्या डिझेल वाहनांबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. या प्रकरणी सर्व घटकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आम्ही १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना परवानावाढ देऊ नये व नवीन डिझेल वाहनांना परवानगी देऊ नये, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांनी दिला.
लवादाने केंद्र व राज्य सरकारला असा आदेश दिला आहे की, सरकारी खात्यांसाठी डिझेल वाहनांची खरेदी करण्यात येऊ नये. दिल्ली सरकारने आता जी सम-विषम क्रमांकाच्या वाहनांविषयी योजना जाहीर केली आहे त्यामुळे उलट लोकांना दोन मोटारी खरेदी करण्यास उत्तेजन मिळेल.