पहिल्या जनता दरबारमध्ये गोंधळ झाल्याने त्यापासून धडा घेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला जनता दरबार रद्द केला आहे. त्याऐवजी लोकांना दूरध्वनीद्वारे, मेल किंवा टपाल करून आपले गाऱ्हाणे मांडता येईल.
ज्या लोकांना आपल्याला केवळ भेटायचे आहे, त्यांच्यासाठी आठवडय़ातून एक दिवस दोन ते तीन तास उपलब्ध असू, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
शनिवारी केजरीवाल यांच्या पहिल्या जनता दरबारात शेकडो लोकांमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे केजरीवाल यांना जनता दरबार सोडून जावे लागले होते. ही घटना ध्यानात घेऊन आम्ही एक व्यवस्था तयार केल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. आम्ही कॉल सेंटर उभारणार आहोत. जे आम्हाला दूरध्वनी करू शकत नाहीत, त्यांनी टपालाने आपल्या सचिवालयात तक्रारी पाठवाव्यात. ते दोन-तीन दिवसांत सुरू होईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
पाणी माफियांकडून जिवाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याबाबत विचारले असता, आपल्या जिवाला कुठलाच धोका नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले. आपल्याला सुरक्षा नको, सामान्य व्यक्तीप्रमाणे आपण जगणार आहोत, असे केजरीवाल यांनी पुन्हा स्पष्ट केले. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना सुरक्षा गरजेची नाही. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना देशात जी सुरक्षा देण्यात आली आहे, ती सामान्य व्यक्तीला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेत व्यत्यय
‘आप’चे नेते प्रशांत भूषण यांच्या विष्णू गुप्ता या कार्यकर्त्यांने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वेळीच बाहेर काढण्यात आले. काश्मीरबाबत प्रशांत भूषण यांच्या वक्तव्यावरून त्याने घोषणाबाजी केली. हा काँग्रेस आणि भाजपचा कट असल्याचा आरोप भूषण यांनी केला.