लोकसभा निवडणुकीपासून ते विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लीम मतांवर डल्ला मारणाऱ्या एमआयएम या पक्षाला बिहारच्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये काहीच प्रभाव पाडता आलेला नाही. ‘हैदराबादी बिर्याणी’ उत्तर भारतात पसंत पडत नाही हे जनता दल(यू), समाजवादी पक्षातील काही मुस्लीम नेत्यांनी प्रचारात केलेले विधान सत्य ठरले आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएमला मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये चांगली मते मिळाली होती. राज्य विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे दोन आमदार निवडून आले तर काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या पराभवास हातभार लावला. औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक किंवा वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही एमआयएमला चांगली मते मिळाली होती. अल्पसंख्याक मतांचे विभाजन करण्याकरिता भाजपकडून एमआयएमला मदत केली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो. बिहारमध्ये मुस्लीम मतांची लक्षणीय संख्या लक्षात घेता एमआयएम मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये मुसंडी मारेल, अशी अटकळ बांधली जात होती. विशेषत: मुस्लीमबहुल सीमांचल प्रदेशात पक्षाच्या अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात एमआयएमची पाटी कोरी राहिली आहे. पक्षाला एकूण मतांच्या फक्त ०.२ टक्के मते मिळाली आहेत. मुस्लीम मतदारांनी एमआयएमऐवजी नितीशकुमार-लालूप्रसाद-काँग्रेस या महाआघाडीलाच पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते. असाउद्दिन ओवेसी हे हैदराबादचे खासदार आहेत. यामुळेच हैदराबादी बिर्याणी उत्तरेत पसंत पडत नाही, असा दावा समाजवादी पक्षाचे आझम खान किंवा लालूप्रसाद यांच्या पक्षाच्या मुस्लीम नेत्यांनी केला होता.