देशात आढळलेल्या करोनाच्या उत्परिवर्तीत विषाणूंविरोधांत कोव्हॅक्सिन लस चांगलीच परिणामकारक ठरत असल्याचे या लशीमधील घटकांमध्ये बदल करण्याची आवश्यकता अद्याप तरी वाटली नाही, असे सरकारच्या वतीने शुक्रवारी लोकसभेत सांगण्यात आले.

भारतामध्ये सध्या ब्रिटनमधील दोन नवकरोना, दक्षिण आफ्रिकेतील एक आणि ब्राझीलमधील एक अशा चार प्रकारच्या नवकरोनांची लागण झालेले रुग्ण आहेत, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी सांगितले.

उत्परिवर्तीत विषाणूंवर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लशी कितपत परिणामकारक आहेत, त्याची माहिती चौबे यांनी दिली. ते म्हणाले की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या परिणामकारकतेचा विचार केला असता, ब्रिटन आणि ब्राझीलमधील नवकरोनात तसा मोठा फरक दिसून आलेला नाही. तथापि, दक्षिण आफ्रिकेतील नवकरोनावर कोव्हॅक्सिन कितपत परिणामकारक आहे त्याचे विश्लेषण सुरू आहे.

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची कोव्हिशिल्ड लस ब्रिटनमधील नवकरोनावर ७४.६ टक्के परिणामकारक असल्याचे आढळले असून ती ब्राझीलच्या नवकरोनावरही परिणामकारक आहे. तथापि, दक्षिण आफ्रिकेतील नवकरोनावर या लशीची परिणामकारकता केवळ १० टक्केच असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान बर्लिनहून आलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीचा वापर जर्मनीने पुन्हा सुरू केला आहे. रक्तातील गुठळ्यांच्या संशयाने तेथे वापर थांबविण्यात आला होता.

भारतात ‘स्पुटनिक’च्या वीस कोटी मात्रा पुरविण्यासाठी करार

नवी दिल्ली : रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) व स्टेलिस बायोफार्मा यांनी रशियन बनावटीच्या २० कोटी मात्रांचे उत्पादन व पुरवठा करण्यासाठी भागादारी केली आहे. आरडीआयएफ व स्टेलिस बायोफार्मा प्रा.लि. यांच्यात याबाबत करार झाला असून एन्सो हेल्थकेअर एलएलपी या रशियन सार्वभौम संपत्ती निधीच्या सहकार्याने स्पुटनिक ५ ही लस भारतात पुरवली जाणार आहे.

२०२१ मधील तिसऱ्या तिमाहीत या लशीचा पुरवठा सुरू होणार असून स्टेलिसने आरडीआयएफ समवेत आणखी जास्त लशी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्टेलिस बायोफार्माबरोबरचा आमचा करार महत्त्वाचा असून त्यामुळे लशीचा पुरवठा वाढणार आहे असे रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमीत्रेव यांनी म्हटले आहे.  स्ट्राइडस समूहाचे संस्थापक अरुणकुमार यांनी सांगितले की, आरडीआयएफबरोबर भागीदारी करून स्पुटनिक ५  लशीचा जागतिक पुरवठा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.