कर्तारपूर मार्गिकेचा वापर करून गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देणाऱ्या भारतीय शीख यात्रेकरूंसाठी पासपोर्टची अट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका वर्षांसाठी शिथिल केली आहे. गुरुद्वाराला भेट देणाऱ्या शीख यात्रेकरूंकडे पासपोर्ट असणे आवश्यक असल्याचे त्यापूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने जाहीर केले होते.

गुरू नानक यांच्या ५५० व्या जंयतीनिमित्त भारतीय शीख यात्रेकरूंसाठी पासपोर्टची अट एका वर्षांसाठी शिथील करण्यात आली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्याचप्रमाणे १० दिवस अगोदर नोंदणी करण्याची आणि ९ व १२ नोव्हेंबर रोजी प्रत्येक यात्रेकरूकडून २० डॉलर शुल्क आकारण्याची अटही इम्रान खान यांनी रद्द केली आहे. आम्ही हे स्पष्टीकरण भारताकडे दिले आहे, असेही फैझल यांनी सांगितले.

लष्कर आणि इम्रान खान यांच्यात दुरावा
कर्तारपूर गुरुद्वाराला भेट देणाऱ्या शीख यात्रेकरूंकडे पासपोर्ट असणे गरजेचे आहे का त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे भारताने पाकिस्तानला बुधवारी सांगितले होते. त्यावर कर्तारपूर मार्गिकेचा वापर करण्यासाठी भारतीय शीख यात्रेकरूंकडे पासपोर्ट असणे गरजेचे आहे, असे पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जन. आसिफ गफूर यांनी स्पष्ट केले होते. यावरून पाकिस्तानचे लष्कर आणि इम्रान खान यांच्यातील दुरावा वाढल्याचे दिसत आहे.

चांदीचे छत्र, रुमाल डॉ. सिंग यांच्याकडे सुपूर्द
दिल्ली काँग्रेसने गुरुवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे कर्तारपूर गुरुद्वारा साहिबमध्ये अर्पण करण्यासाठी चांदीचे छत्र आणि रुमाल सुपूर्द केला. पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळांत डॉ. मनमोहन सिंग यांचा समावेश आहे. हे चांदीचे छत्र आणि रुमाल गुरुद्वारामध्ये अर्पण करावे आणि देशात शांतता नांदण्यासाठी प्रार्थना करावी, असे दिल्ली शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी सांगितले.

सिद्धू यांना उद्घाटनाला जाण्याची परवानगी
पाकिस्तानातील कर्तारपूर मार्गिका उद्घाटन समारंभाला हजर राहण्यासाठी पंजाबमधील काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना सरकारने राजकीय परवानगी दिली आहे, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सिद्धू यांना निमंत्रित केले होते, त्यामुळे सिद्धू यांनी त्या समारंभाला हजर राहण्याची परवानगी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागितली होती.

यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी ‘पर्यटन पोलीस दल’
कर्तारपूर मार्गिकेला भेट देणाऱ्या भारतीय यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी गुरुवारी १०० कर्मचारी असलेले विशेष ‘पर्यटन पोलीस दल’ तैनात केले आहे. मार्गिकेच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तानच्या रेंजर्सची असून पंजाब पोलीस त्यांना सहकार्य करणार आहेत. शीख यात्रेकरू आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पर्यटन पोलीस दलातील १०० जणांची तुकडी तैनात करण्यात आली आहे, असे पंजाब पोलिसांचे प्रवक्ते नियाब हैदर नक्वी यांनी सांगितले.