यावर्षी दिल्लीमध्ये एकही दारूचे नवे दुकान सुरू झाले नाही अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. तसेच आता एकही नवे दारूचे दुकान सुरू करू देणार नाही असेही त्यांनी सांगितले. सध्या राजधानीत जी दारूची दुकाने सुरू आहेत त्या दुकांनांबाबत लवकरच ‘मोहल्ला सभे’त निर्णय घेतला जाईल अशीही माहिती त्यांनी बुधवारी दिली. दारूची जी दुकाने सुरू आहेत ती जर बंद करावी असे दिल्लीकरांचे म्हणणे असेल तर या दुकानांबाबत देखील निर्णय घेतला जाईल , पण या निर्णयासाठी ‘मोहल्ला सभे’त पंधरा टक्के जनतेचा होकार असायला हवा असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी सांगितले. एखाद्या दारूच्या दुकांनाचा रहिवाशांना त्रास होत असेल तर ती दुकाने दुसरीकडे देखील हटवण्यात येईल असेही सिसोदिया यांनी स्पष्ट केले. दारूच्या दुकानांनबाहेर जर काही अप्रिय घटना घडल्या तर त्याला मालक जबाबदार असेल, या संपूर्ण प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यास ते बद्ध असतील आणि असे न केल्यास त्या मालकांवर गुन्हा नोंदवला जाईल असा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. आपल्या परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याबाबत स्थानिकांनी मोहल्ला सभा घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून करण्यात आले. येणा-या काळात बिहारसारखीच दिल्लीत देखील पूर्ण दारूबंदी केली जाईल असेही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.