मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमधील मंत्री आणि भाजपाचे नेते ओ पी धुर्वे यांनी भूकबळीबाबत असंवेदनशील विधान केल्याने वाद निर्माण झाला. ‘सध्याच्या युगात भूकबळीसारखी घटना घडणार नाही’, असा दावा त्यांनी केला आहे.

मध्य प्रदेशमधील भिंड येथे दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. हा भूकबळीचा प्रकार असल्याचे समोर आले आहे. मुलीचे वडील मजुरीचे काम करायचे. पण त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते. ‘काम नसल्याने माझ्याकडे पैसे नव्हते. यामुळे तिला खाण्यासाठीही काहीच घेता आले नाही’, असे तिच्या वडीलांनी म्हटले होते.

भिंडमधील भूकबळीच्या घटनेवर शिवराज सरकारमधील मंत्री ओ पी धुर्वे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर त्यांनी वादग्रस्त विधान केले. ‘राज्यात रॅशन दुकानांवर अन्नधान्याची कमतरता नाही. भारतात भीक मागणाऱ्यालाही जेवण मिळते. देशातील लोक इतके तरी संवेदनशील आहेत. त्यामुळे सध्याच्या युगात भूकबळी अशक्य असल्याचे मला वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शिवराजसिंह चौहान यांचे निकटवर्तीय रामपाल सिंह यांच्यावरील आरोपांमुळे चौहान हे अडचणीत आले आहेत. आता धुर्वे यांच्या विधानामुळे त्यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे.